पी एम फंडातील खर्चाबाबत पारदर्शकता हवी – राहुल गांधी| नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधींनी शुक्रवारी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. मोदी सरकारने जनतेपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्याची गरज आहे. मात्र सरकार आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यास घाबरत आहे. सरकार जोखीम पत्करण्यास तयार नाही. मात्र ही वेळ जोखीम घेण्याचीच आहे, अस राहुल गांधी म्हणाले.

आर्थिक पॅकेजची घोषणा केल्यास, पैसा खर्च केल्यास रुपयाची अवस्था गंभीर होईल, अशी भीती मोदी सरकारला वाटते. मात्र सरकारला आता जोखीम स्वीकारावी लागेल. कारण शेवटच्या घटकापर्यंत पैसा पोहोचायला हवा. सरकार जितका जास्त वेळ विचार करेल, तितका आपला वेळ वाया जाईल, असे राहुल गांधींनी म्हटले.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या पीएम केअर्सचे ऑडिट होण्याची गरज असल्याचे राहुल गांधी म्हणाले. पीएम केअर्स फंडाचे ऑडिट आवश्यक आहे. पीएम केअर्समधला किती पैसा खर्च झाला आणि त्यात किती पैसा यायला हवा, हे जनतेला कळायला हवे, असे राहुल गांधींनी म्हटले. पीएम केअर्समध्ये जमा होणारा निधी, त्याचा खर्च याबद्दल पारदर्शकता गरजेची असल्याचे ते म्हणाले.

लोकांच्या मनात कोरोनाबद्दल भीती आहे आणि ती भीती दूर करण्यात सरकार अपयशी ठरत आहे, अशा शब्दांत राहुल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. लॉकडाऊन नेमका कधीपर्यंत चालणार, हे सरकारने स्पष्टपणे सांगायला हवे. कोरोना संकट केवळ एक टक्के जनतेसाठी धोकादायक आहे. मात्र ९९ टक्के लोकांच्या मनात त्याची भीती आहे. ही भीती सरकारने दूर करण्याची गरज असल्याचे राहुल म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *