मी काय उडत येऊ का..? असा उद्धट खुलासा देणारा लिपिक निलंबित..

| यवतमाळ | ‘कामाच्या ठिकाणी उडत येऊ का?’ असं म्हणणाऱ्या यवतमाळच्या महागावमधील लिपिकाला अखेर निलंबित करण्यात आलं आहे.  यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तहसीलदारांनी सतत गैरहजर राहणाऱ्या लिपिकाला नोटीस दिली होती. मात्र लिपिकाने नोटिशीला उद्धट, उर्मट भाषेत उत्तर दिले आणि त्याचे तेच उत्तर त्याच्या अंगलट आले आहे. 

महागाव तहसील कार्यालयात कार्यरत लिपिक अरुणकुमार खैरे हा अनेक दिवसांपासून गैरहजर होता. त्यामुळे महागाव तहसीलदार निलेश मडके यांनी त्याला दोनदा नोटीस बजावली आणि समक्ष येऊन खुलासा करावा असे सांगितले. मात्र  लिपिकाने कोरोना महामारी सर्वत्र आहे. लॉकडाऊनमुळे अडकून पडलोय. कामाच्या ठिकाणी उडत येऊ काय? असे बेजबाबदार उत्तर दिलं. त्याचं हे उद्धट उत्तर त्याला चांगलंच भोवलं असून आता त्याला निलंबित करून घरीच बसवले आहे. 

विशेष म्हणजे लिपिक खैरेचे महागाव तहसीलदार यांना लिहिलेले पत्रच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या पत्रात त्यानं असंविधानिक भाषेचा वापर केला आणि कामात टाळाटाळ आणि सतत गैरहजर असल्याबाबत प्रकार चौकशीत पुढे आला असून त्याचे हेच उत्तर त्याला निलंबित होण्यापर्यंत घेऊन गेले.

 ‘लॉकडाऊनमुळे गावाकडं अडकून पडलोय, मी वणीवरून महागावला उडत येऊ का? तसेच समजा मुंबईमध्ये तहसीलदार साहेब तुम्ही अडकून पडले तर मी तुम्हाला कुत्र्यासारखा ओरडून या या म्हटले तर मला लोकं मला पागल समजतील’ असं या उत्तरात लिपिकाने म्हटलंय. ‘तुम्ही मागील २-४ महिन्यापासून वेड्यासारखे का करीत आहात? आणि मी मेलो किंवा तुम्ही मेले तरी महागाव तहसील बंद पडत नाही, हे लक्षात घ्या’, अशा प्रकारची भाषा या पत्रावर लिपिकाने वापरली आहे.  कोरोनाच्या संसर्गाच्या काळात अनेक कार्यालयं सुरू आहेत. अशात या लिपिकाच्या पत्राने खळबळ उडविली होती. हे पत्र सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

या संदर्भात यवतमाळ निवासी जिल्हाधिकारी ललितकुमार व्हराडे यांनी दखल घेतली आणि उपविभागीय अधिकारी यांना चौकशी करुन योग्य निर्णय घेण्यास सांगितले होते. नंतर उमरखेडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी चौकशी करीत त्याची सत्यता तपासून लिपिकावर निलंबनाची कारवाई केली आहे.

शासकीय कार्यालयात सभ्य शिष्टाचार आणि सन्मान राखूनच बोलले जाते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्याला दिलेल्या पत्रात मर्यादा विसरत उर्मट भाषेचा प्रयोग केला. त्यामुळे लिपिक अरूणकुमार खैरे याला जिल्हा प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे. या प्रकरणी वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे, गैरहजेरी आदी कारणास्तव त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

तसेच खैरे यांना सर्दी, खोकला असतांना देखील त्यांनी तपासणी न करता ते गावी गेले. शासनाने कोविड १९ विषाणुचा प्रसार थांबविण्यासाठी दिलेल्या सूचनांचे त्यांनी पालन केले नाही व कोविड १९ च्या प्रोटोकाॅलचे उल्लंघन केले. त्यामुळे इतरांचे आरोग्य कळत नकळत धोक्यात आणले. अशी कारणं देत खैरे याला उमरखेड उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी तात्काळ निलंबित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *