आमच्या सोबत जे झाले तो पूर्वनियोजित कट होता..!
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची जहरी टीका..!

| जळगाव | विधान परिषद निवडणुकीचं वार वाहू लागलं असताना भाजपातील इच्छुकांचा असंतोष आता बाहेर पडू लागला आहे. भाजपानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा सूरही उमटू लागला आहे. त्यावर नव्यानं सामाजिक समीकरणाची मांडणी करण्याचं काम केलं आहे, असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. भाजपाच्या या स्पष्टीकरणाचा समाचार घेत पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर इशारा दिला आहे. उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी पक्षातील नेत्यांना खडेबोल सुनावले.

काय म्हणाले एकनाथ खडसे :

 मी सदस्य असलेल्या राज्याच्या काेअर कमिटीने माझ्यासह पंकजा मुंडे आणि बावनकुळेंच्या नावाची विधान परिषदेसाठी शिफारस केली. परंतु हे नाटक हाेते. सरळ फसवणूक असल्याची बाब आता लक्षात आली आहे.  मला उमेदवारी नसल्याचा निराेप रात्री ११ वाजता मिळाला. परंतु ज्यांना उमेदवारी मिळाली ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता विधान भवनात हाेते. त्यांनी उमेदवारी अर्जाची तयारी, स्टॅम्प आणि एनआेसीची कागदपत्रे ही मार्च महिन्यात तयार केलेली हाेती.

हे सर्व पूर्वनियाेजित असल्याचे स्पष्ट हाेत असल्याचे पक्षाने माझ्यासाेबत दगाफटका केला आहे. पक्षात वारंवार खच्चीकरण करणे, कट-कारस्थाने रचून मला पक्षाबाहेर ढकलण्याचे प्रयत्न पक्षातील काही लाेक जाणीवपूर्वक करीत आहेत. संघटनेत पूर्वीसारखी स्थिती नाही, पक्षात लाेकशाही उरलेली नाही. राज्यात पक्ष विशिष्ट मूठभर लाेकांच्या हाती एकवटला आहे.

 प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील स्वत:चा सुरक्षित मतदारसंघ देऊन निवडून आणणाऱ्या मेधा कुलकर्णींना संधी न मिळणे याेग्य नाही.  विधान परिषदेसाठी पंकजा, मी आणि बावनकुळे यांची शिफारस केंद्रीय समितीकडे केली असल्याचा दावा चंद्रकांत पाटील करीत आहेत. मग पडळकरांसह अन्य चाैघांनी उमेदवारी अर्जासाठी लागणारे स्टॅम्पपेपर, विविध कार्यालयांच्या एनआेसी मार्च महिन्यातच कशा तयार करून ठेवल्या? ही निष्ठावंतांची शुद्ध फसवणूक आहे.

यासंदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांना फाेन केला हाेता. परंतु ते फाेनवर आलेच नाहीत. त्यांना आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मी याबाबत विचारणा करणार आहे. मी विराेधी पक्षनेता असताना एकट्याच्या बळावर राज्यात सत्ता आणली हाेती. परंतु, त्यानंतर प्रमुख स्पर्धक असल्याने माझ्यावर नकाे ते आराेप करीत, षडयंत्र रचून मला बाहेर काढले. विधानसभा निवडणुकीत देखील उमेदवारी मिळू दिली नाही. घरात वाद निर्माण करण्यासाठी मुलीला उमेदवारी दिली आणि तिचा पराभव करण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न केले. पक्षातील विराेधक अजूनही शांत नाहीत. मी पक्षाच्या बाहेर कसा जाईल, याचेच प्रयत्न ते करीत आहेत. या विधानसभा निवडणुकीत मूठभरांमुळे पक्षाची सत्ता गेली. विराेधी पक्षात बसावे लागले.  असेच चालत राहिले तर १०५ चे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही, ही बाब मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार आहे. 

दाेन वेळा आॅफर
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फाॅर्म माझ्याकडे पडून हाेता. परंतु, मी ज्या पक्षात आयुष्याची ४० वर्षे वेचली ताे पक्ष न साेडण्याचा निर्णय घेतला. परवा विधान परिषदेसाठी पक्षाने डावलल्यानंतर काँग्रेसने सहाव्या जागेसाठी आॅफर दिली. पक्षात माझ्यावर अन्याय हाेत आहे, हे पाहत असलेल्या ६ ते ७ आमदारांनी फाेन करून मला मतदान करण्याची तयारी दर्शविली, परंतु तरीदेखील मी ही आॅफर नाकारली. मी पक्षात राहण्याचे प्रयत्न करीत असताना काही लाेक मला पक्षाच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कार्यकर्त्यांचा दबाव, पण ही वेळ चुकीची
माझ्यावर उघडपणे हाेत असलेल्या अन्यायामुळे जिल्ह्यातील नव्हे तर राज्यभरातील कार्यकर्ते दरराेज फाेन करीत आहेत. तुम्ही काही तरी निर्णय घ्या, पक्ष साेडा यासाठी दबाव आणत आहेत. परंतु, ही स्थिती काेराेनाशी लढण्याची आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही. आधी काेराेनाशी लढू. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून याेग्य निर्णय घेऊ, असेही खडसे म्हणाले.

पक्षात उपऱ्यांचीच चलती
खडसे म्हणाले, भाजपमध्ये पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत. निष्ठावंताना किंमत उरली नाही, पक्षात उपऱ्यांचीच चलती आहे. काडीचेही याेगदान नसलेले लाेक पदांवर आहेत. पक्षाला शिव्या देणाऱ्यांना उमेदवारी दिली जाते. उमेदवारी मिळाली नाही, याचे मला दु:ख नाही. परंतु, पक्षातील ज्या इतर निष्ठावंतांना डावलून नवख्यांना संधी दिली याची खंत आहे.

एकंदरित , उमेदवारी न मिळाल्याने आणि आपल्या सारख्या वरिष्ठ नेत्याला अंधारात ठेवल्याने त्यांनी देवेंद्र फडणवीस गटावर हल्ला केला आहे, आता यावर फडणवीस काय बोलतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *