| औरंगाबाद |सध्या सगळीकडं करोना आणि लॉकडाउन अशीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे सगळे घरात बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर जीवन जगणाऱ्यांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल चालू आहेत.
लॉकडाउनमुळे सगळीकडे शुकशुकाट असताना औरंगाबादमध्ये एका बेवारस वृद्धेचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह घाटी रुग्णालयात पडून होता. मात्र, कुणीही अंत्यसंस्कार करण्यास समोर आलं नाही. त्यावेळी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार केले आणि त्याचबरोबर मुखाग्नीही त्यांनी स्वतः दिला.
सत्तरपेक्षा जास्त वयोमान असलेल्या या महिलेचा दोन दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला. ही घटना शिवसेनेचे सोमनाथ बोंबले व इतर कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीनं त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केलं. दाखल करून घेतल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान अचानक त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर घाटी प्रशासनानं नियमाप्रमाणे २४ तास त्यांच्या नातेवाईकांची वाट बघितली.
मात्र, त्या महिलेचा मृतदेह घेण्यास कुणीही आलं नाही. त्यानंतर घाटी प्रशासनाकडून त्याचं पार्थिव बेवारस घोषित करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी नियमांची पूर्तता करत त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर कैलासनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष गोष्ट अशी की आमदार अंबादास दानवे यांनी या वृद्धेला अग्नी दिला.
ज्याचे कोणी नाही त्याची #शिवसेना. अंत्योदय योजनेच्या माध्यमातून सुपारी हनुमान येथे राहणाऱ्या एका वृद्धेवर जड मनाने अंत्यसंस्कार केले. हा या योजनेतील १७६ वा अंत्यविधी होता. #संभाजीनगर pic.twitter.com/Ad9qCdHe4a
— Ambadas Danve (@iambadasdanve) April 25, 2020
गुलमंडीतील सुपारी हनुमान मंदिराजवळ ही महिला भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवायच्या. गेल्या ३५ वर्षांपासून त्या इथे होत्या. अंबादास दानवे यांच्यामार्फत अंत्योदय योजनेतंर्गत बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. या योजनेतंर्गत आतापर्यंत १७६ बेवारसांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अंबादास दानवे हे सध्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि विधान परिषदेचे सदस्य आहेत.