आमच्या वॉर्डात का काम करतोस? भाजप खासदार पुत्राने भाजप कार्यकर्त्यालाच बेदम ठोकले..!

| औरंगाबाद | आमच्या वॉर्डात का काम करतोस? असा सवाल करत भाजपचे राज्यसभा खासदार व औरंगाबाद चे माजी महापौर भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांनी भाजपच्याच कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भागवत कराड यांच्या मुलांनी भाजप युवा मोर्चाचा सदस्य कुणाल मराठे या तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत कुणाल मराठेच्या घरातील महिलांनादेखील धक्काबुक्की करण्यात आली.

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काही तरुण कुणाल मराठेला त्याच्या घरात घुसून बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. ही घटना काल (२३ मे) रात्री साडे दहा वाजेच्या सुमरास घडली आहे.

औरंगाबादमधील कोटला कॉलनीच्या समता नगर परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात काल कोरोनाशी संबंधित एक रुग्ण आढळला होता. त्यामुळे या परिसरात कुणाल मराठे या कार्यकर्त्याने सॅनिटायझरची फवारणी केली. याबाबत भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बेदम मारहाण केली, असा दावा कुणाल मराठे या तरुणाने केला आहे.

 या वॉर्डात तू का काम करतोस? भाजपकडून फक्त आम्हीच काम करणार, अशी धमकी देण्यात आली. यानंतर घरात घुसून मारहाण करण्यात आली, असं कुणाल मराठेकडून सांगण्यात आलं आहे.  दरम्यान, या घटनेतून भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. याशिवाय आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पक्षांतर्गत राजकारण सुरु असल्याचं दिसत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

कुणाल नितीन मराठे (वय-२५, कोटला कॉलनी) यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. कुणाल यांनी सांगितलं की, २३ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ते घरी जेवण करत असताना हर्षवर्धन कराड, वरुण कराड आणि पवण सोनवणे आले. तू वार्डमध्ये फिरायचं नाही. कारण आगामी महानगर पालिका निवडणुकीत मला तिकीट मिळणार आहे. लोकांनाही मदत करत जाऊ नकोस, असा दम देत तिघांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्यासह माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला या तिघांपासून धोका असल्याचं कुणाल मराठे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *