महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप येणार..?

| मुंबई | एकीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी झुंजत असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ‘मातोश्री’वर गेले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत पवारांची गुप्त चर्चा झाली. राज्य सरकारविषयी असलेली नाराजी पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याची चर्चा आहे.

राज्यात कोरोनाचं संकट घोंघावत असताना महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या तीन प्रमुख नेत्यांमध्ये नेमकी काय खलबतं झाली, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

 कोरोना’ची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार कमी पडत असल्याची टीका भाजप नेते वारंवार करत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कालच राज्यपालांची भेट घेतली आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. कर्नाटक, मध्य प्रदेशमधील सरकार उलथवण्याचा प्रकार घडल्यानंतर महाराष्ट्रातही तशाच हालचाली होण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात रंगवला जात आहे. 

 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये त्यांच्या मनात ठाकरे सरकारवरील नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा सल्ला देणं किंवा महाविकास आघाडी तोडण्याची हीच वेळ असल्याचं सुचवणे, हे याचेच सूचक मानले जात आहे.

तर शरद पवार यांनी लॉकडाऊन उठवून अर्थचक्र सुरु करण्यासाठी साखर उद्योग, कृषी उद्योगाला चालना देण्याचे मत व्यक्त केले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत तात्काळ लॉकडाऊन उठवला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याबाबत चर्चेसाठी पवार ‘मातोश्री’ची पायरी चढले असावेत, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *