लॉक डाऊन नंतर कामाचे तास ८ वरून १२ होणार..?


  • कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ८ तासांवरून १२ तास करण्याचा केंद्राचा विचार..
  • राज्य सरकार किंवा संबंधित प्रशासनाला कामाचे तास ठरवण्याचा अधिकार मिळणार..

मुंबई/ प्रतिनिधी:  कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवत असल्याची घोषणा केली. या मोठ्या घोषणेनंतर आता सरकार कोरोनामुळे झालेलं नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीनं तयारीला लागल्याचं दिसत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढण्याची दाट शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ८ तासांवरून १२ तास करण्याचा केंद्राचा विचार असून त्यासाठी अध्यादेश काढला जाऊ शकतो. इकॉनॉमिक टाईम्सनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

मोदी सरकारनं काढलेल्या अध्यादेशामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांचे तास वाढवण्याचे अधिकार मिळतील. कामाचे तास किती वाढवायचे याचा निर्णय सर्वस्वी राज्यांना असेल. यासाठी केंद्र सरकारचं कामगार मंत्रालय ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कन्डिशन्स विधेयक आणेल. त्यामुळे राज्य सरकार किंवा संबंधित प्रशासनाला कामाचे तास ठरवण्याचा अधिकार मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं इकॉनॉमिक टाईम्सनं म्हटलं आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक कर्मचारी, मजूर त्यांच्या राज्यांमध्ये परतले आहेत. लॉकडाऊननंतर हा कर्मचारी वर्ग तातडीनं कार्यालयांमध्ये, कारखान्यांमध्ये रूजू होणार नाही. त्यासाठी काही दिवसांचा कालावधी जावा लागेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि त्यामुळे होणारं नुकसान भरून काढण्यासाठी कामाचे तास वाढवले जावेत, अशी मागणी कंपन्या, उद्योग आणि संस्थांच्या प्रमुखांनी सरकारकडे केली होती. त्यानंतर सरकारनं अध्यादेश काढण्याची तयारी सुरू केली.

पंतप्रधान मोदींनी २४ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. तो २१ दिवसांचा कालावधी आज संपला. मात्र कोरोनाबाधितांचा आकडा सातत्यानं वाढत असल्यानं मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवला. २० एप्रिलपर्यंत कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या भागांमधले निर्बंध शिथिल केले जातील, असं मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना सांगितलं.


1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *