राज्यातील जिम तात्काळ सुरू करा; लोकजागर पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

| मुंबई | कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली असून अनलॉक प्रक्रियेमुळें राज्यात सध्या हळू हळू सर्व गोष्टी पूर्वपदावर आलेल्या आहेत. लोकल ट्रेन, बस, एस. टी, शॉपिंग मॉल्स,मंदिरे,सलून,मद्यविक्रीची दुकाने, अन्य बाबी सुरू करण्यात आल्या आहेत. परंतू व्यायाम शाळा मात्र सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे या ताळेबंदीच्या काळात या फिटनेस उद्योगाला आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसलेला आहे.

राज्यात १५ हजार पेक्षा जास्त व्यायामशाळा चालक, मालक, प्रशिक्षक, सफाई कर्मचारी, योग शिक्षक, झुंबा शिक्षक, आहारतज्ञ, मसाजतज्ञ, न्यूट्रिशियन असे अनेक पूरक व्यवसायाचे कामगार बेरोजगार झाले आहेत. जिम व्यवसायिकांचे थकित लाखोंचे भाडे, विद्युत बिल, कर्मचाऱ्यांचे पगार, नूतनीकरण तसेच अन्य खर्च कसा भागवायचा ही चिंता जिम व्यावसायिकांना भासू लागली आहे. राज्यात अनलॉक तीनचा टप्पा सुरू होऊनही व्यायामशाळा सुरू करण्याची परवानगी मात्र राज्य सरकार कडून अजून मिळाली नाही. राज्यात एकीकडे कोरोनामुळे अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असताना त्यात वाढती बेरोजगारीने मात्र उच्चांक गाठला आहे. या पार्श्वभूमीवर लोकजागर पार्टीकडून जिम सुरू करण्याचे आवाहन केले जात आहे.

सरकारला मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळतो म्हणून दारू विक्री व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी परवानगी दिली आहे. दारू व तंबाखूजन्य पदार्थामुळे कोरोनाच्या संसर्गास आमंत्रण देत आहोत याचा मात्र विसर राज्य सरकारला पडला आहे. व्यायामामुळे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते जेणे करून कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिकार करू शकतो यासाठी राज्यातील व्यायामशाळा त्वरित सुरू करण्याचा आदेश राज्य सरकारने द्यावा.केंद्र सरकारने जिम सुरू करण्यासाठी काही नियमावली देण्यात आली असूनही राज्य सरकार जिम सुरू करण्याचे निर्देश का देत नाही? एस टी किंवा बस मध्ये सरकारी नियमावली नुसार पंचवीस प्रवासी बसविण्याचे नियम आहेत तर मग १००० स्क्वेअर फूट व्यायामशाळेत शारीरिक अंतर ठेवून तसेच संपूर्ण व्यायामशाळा सॅनिटायजेशन करून देखील सुरू करू शकतो यावर राज्य सरकार का दुर्लक्ष करत आहे? अर्थात यामागे राजकीय डावपेच तर नाही ना? हा प्रश्न पडतो असा खडा सवाल लोकजागर पार्टीच्या वतीने करण्यात आलेला आहे.

त्यामुळे राज्य सरकारने ढासळती अर्थव्यवस्थेकडे लक्ष केंद्रित करून जिम व्यवसायिकांना दिलासा मिळावा म्हणून त्वरित जिम सुरू करण्याचे आदेश द्यावे आणि फिटनेस उद्योगातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबियांना धान्यवाटप करण्यात यावे, अशी मागणी लोकजागर पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ज्ञानेश वाकुडकर, कोंकण प्रदेश संयोजक रविंद्र रोकडे व मुंबई प्रदेश संयोजक समीर देसाई यांनी राज्य सरकारकडे लेखी निवेदनातून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *