शिक्षकांचे कैवारी, बुलंद आवाज माजी आमदार रामनाथ मोते कालवश..!

| ठाणे | माजी शिक्षक आमदार, शिक्षकांचे कैवारी, शिक्षकांच्या कोणत्याही प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे शिक्षक नेते रामनाथ मोते यांचे नुकतेच निधन झाले. जवळपास ते ४७ वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते.

दरम्यान मोते यांची कल्याण येथील कार्यालयात सकाळी ७ पासून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी अविरत सेवा सुरू असायची. १२ वर्षांत विधान परिषद सदस्य म्हणून विधान परिषदेत १०० टक्के उपस्थिती दर्शविल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देखील मिळाला होता. अनुदानित टप्प्यावरील विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, केंद्राप्रमाणे मुख्याध्यापकांना वेतनश्रेणी लागू करण्यासाठी असलेली लक्ष्यवेधी, तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिक्षकांचे प्रश्न, २०१२ नंतर आरटीईच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेली वाताहत, नवीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध, ग्रंथपालांच्या वेतनश्रेण्या, अनुदानित शाळा प्रमाणे विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना सहावा वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येणाऱ्या वेतनासाठीचा लढा, आयसीटी विषय शिक्षकांच्या वेतनाबाबत सरकार दरबारी केलेला पाठपुरावा, कला व क्रीडा शिक्षकांच्या संदर्भातील आरटीईमुळे लोप पावलेल्या पदांच्या बाबतीत उभारलेला लढा, आरटीईमुळे अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेशन व पगारासंदर्भात दिलेला लढा, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी म्हणून केलेला संघर्ष, वेतन श्रेण्यांमधील तफावतीविरुद्ध केलेला लढा असे कित्येक प्रश्न त्यांनी सोडविले आहेत नाहीतर सोडविण्यासाठी सार्वधिक पुढाकार घेतला आहे.

मागील कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सामान्य शिक्षकांच्या आग्रहाखातर त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती. परंतु त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मधुमेहाने ग्रस्त असल्याने त्यांची तब्बेत नजिकच्या काळात थोडीशी नरम होती. आमदार मोते यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

✓ “मागील निवडणुकीदरम्यान आदरणीय अण्णा यांना अतिशय जवळून अनुभवता आले. शिक्षकांप्रती असणारे त्यांचे प्रेम, अचाट बुद्धिमत्ता , प्रश्न सोडविण्याची ताकद सगळे अदभुत असे होते. न थकता सकाळी ७ पासून रात्री उशिरा पर्यंत शिक्षकांसाठी कार्यरत असणारे असे शिक्षकांमधील दुसरे नेतृत्व मी पाहिले नाही. त्यांच्या शेवटच्या अधिकृत पत्रकार परिषदेला मला त्यांचा सह स्टेज शेअर करायल मिळाला, हे माझे भाग्य.! आदरणीय अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली..

– प्राजक्त झावरे पाटील, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *