अतिवृष्टीने शिंदेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलाव फुटला..

| इंदापूर /महादेव बंडगर | आठवडाभर चालू असलेल्या पावसामुळे शिंदेवाडी ता. इंदापूर येथील पाझर तलाव फुटला आहे, पाझर तलाव फुटल्याने शेकडो एकरवर असलेली पिके व शेतजमीनीचे अतोनात नुकसान झाले आहे. कायम दुष्काळाच्या छायेत असलेल्या शिंदेवाडी गावामध्ये आठमाही शेतीसाठी जीवनदायिनी असलेला पाझर तलाव गेला आठवडाभर जोरदार सुरु असलेल्या पावसाचे रुपांतर या दोन दिवसात अतिवृष्टीत झाल्याने पाण्याचा प्रवाह रोखू शकला नाही. १४ ऑक्टोबरच्या रात्री तलावास भगदाड पडले आणि येथील शेतीसाठी वरदान ठरलेला तलाव शेतातील पिकांबरोबरच शेतजमीनाचाही कर्दनकाळ ठरला.

पाझर तलाव फुटल्याने शेकडो एकरवर असलेली मका, कांदा, ऊस, फळभाज्या, पालेभाजीची पिके वाहून गेली. शेकडो एकर शेतीतील माती वाहून जाऊन शेतामध्ये खोल खड्डे पडले आहेत.

साठ वर्षापूर्वी बांधलेल्या या पाझर तलावाचे आजपर्यंत कोणतेही दुरुस्तीचे काम झाले नाही. त्यामुळे पाण्याचा दाब सहन होऊ शकला नाही. आणि अखेर तलाव फुटला.

शेकडो एकर पिकांचे व शेतजमीनीचे पाझर तलाव फुटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे व्हावेत व शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.येथील शेतीसाठी पाण्याचे एकमेव साधन असलेला तलाव फुटल्याने शेतकरी मात्र पुरता हवालदिल झालेला आहे. भविष्याची चिंता सर्वांना सतावताना दिसत आहे. तात्काळ याची दुरुस्ती झाली तर आगामी काळात होणाऱ्या पावसाने पुन्हा तलावात पाणी साठू शकते. अन्यथा फार मोठ्या पाणीसंकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *