अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या- इंदापूर तालुका भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन..

| इंदापूर / महादेव बंडगर | इंदापूर तालुक्यात सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वदूर अतिवृष्टी झालेली असून यामुळे ओढे, नाले, नदी यांना पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घरांमध्ये पाणी साठलेले असून शेतातील मातीही पाण्याबरोबर वाहून गेली आहे.या पावसामुळे शेतकऱ्याची डाळिंब, द्राक्ष, केळी, पेरू आदी फळबागा तसेच ऊस, मका, द्राक्ष, केळी, पेरू यासारख्या पिकांचेही नुकसान झाले आहे. घास,कडवळ यासारख्या चारा पिकांचे नुकसान झाले आहे. अगोदरच कोरोना महामारीच्या संकटामुळे पिकांना बाजार भाव नसल्याने घेतलेल्या शेतकरी अडचणीत असून या अतिवृष्टीमुळे अजूनच अडचणीत आलेला आहे. त्यामुळे त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीची मदत द्यावी अशी मागणी भाजपच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे करण्यात आली आहे.

या निवेदनामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, शासन स्तरावरून करण्यात येणाऱ्या सर्व वसुली तात्काळ थांबवाव्यात. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने ठिकाणी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन गावागावांमध्ये साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून विविध उपाय योजना करण्यात याव्यात.अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.आपल्या मागण्या बाबतीत योग्य निर्णय तात्काळ न घेतल्यास इंदापूर तालुका भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर इंदापूर तालुकाध्यक्ष ऍड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकील भाई सय्यद, युवा नेते महिंद्र रेडके, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष संदिपान कडवळे,पुणे जिल्हा भाजपाचे सचिव तानाजी थोरात, किसान मोर्चाचे संघटक माऊली चवरे, ज्येष्ठ नेते मारुतराव वणवे, मागासवर्गीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शेंडे, युवा मोर्चाचे सचिन सावंत, शिवाजीराव तरंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *