आमदारकीचे प्रतिस्पर्धी उमेदवार, पण भाऊबीजेनिमित्त एकमेकांना दिल्या विजयी होण्याचा शुभेच्छा..!

| अमरावती | राजकीय विचारसरणी आणि मतांना बाजूला ठेवल्यानंतर प्रत्येकजण कुणाचा तरी भाऊ, बहिण, नातेवाईक किंवा मित्र असतो याचा परिचय आज पुन्हा एकदा आला. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत एकमेकांविरोधात काट्याची लढत देत असलेल्या शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे आणि आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यातील भाऊबहिणीचे नाते जुनेच आहे. त्यामुळे आज भाऊबीजेच्या पर्वावर श्रीकांत देशपांडे यांना संगीता शिंदे यांनी मनोभावे ओवाळणी घालून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी देशपांडे यांनी देखील त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला.

संगीता शिंदे यांच्या निवासस्थानाच्या थोड्या अंतरावरच देशपांडे यांचे देखील निवासस्थान आहे. त्यामुळे पहाटेच श्रीकांत देशपांडे यांनी संगीता शिंदे यांच्या भाऊबीजेच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या निवासस्थानी भेट दिली तसेच कुटूंबियांची विचारपूस केली. यावेळी एकमेकांना विजयी शुभेच्छा देखील शिंदे आणि देशपांडे यांनी दिल्या. यावेळी आपले भाऊ या नात्याने संगीता शिंदे यांनी श्रीकांत देशपांडे यांना भाऊबीजेची ओवाळणी घातली तसेच त्यांचे आशीर्वाद देखील घेतले. यावेळी देशपांडे यांचे तोंड गोड करून त्यांना चिरंजीवी शुभेच्छा दिल्या. श्रीकांत देशपांडे यांनी देखील ‘संगीता तू विजयी होवो’ असे आशीर्वाद संगीता शिंदे यांना दिले.

श्रीकांत देशपांडे यांनी नुकतेच मोठ्या आजारातून बाहेर आलेले संगीता शिंदे यांचे पती सचिंन्द्र शिंदे यांची भेट घेऊन त्यांचीही विचारपूस केली. यावेळी शिक्षण संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील देशपांडे यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *