इंदापूरमध्ये तक्रारवाडी आरोग्य उपकेंद्रअंतर्गत कोविड-19 च्या जनजागृतीसाठी ” गुढी महोत्सवाचे” आयोजन.

| इंदापूर / महादेव बंडगर | पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने नुकतेच एक परिपत्रक काढून covid-19 च्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी गुढी महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी आरोग्य उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या तक्रारवाडी,मदनवाडी आणि पोंधवडी या तिन्ही ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने व्यंकटेश लॉन्स येथे सकाळी नऊ वाजता गुढी महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. त्यामध्ये कोरोना आजाराविषयी जनजागृती करणाऱ्या रांगोळी, केक तसेच कोरोना रुग्णाला पोषक आहार ठेवण्यात आलेले होते. 11 ऑक्टोबर हा “जागतिक बालिका दिन ” सुद्धा यावेळी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या तीनही गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि शिक्षक बंधू- भगिनी यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी भिगवण रोटरी क्लबचे संस्थापक सचिन बोगावत, रोटरी क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर, मदनवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. आम्रपाली बंडगर, तक्रारवाडी च्या सरपंच सौ. शोभाताई वाघ,पोंधवडीचे सरपंच नानासाहेब बंडगर, रोटरी क्लबचे सदस्य प्रवीण वाघ, मदनवाडी विकास सोसायटीचे चेअरमन विष्णुपंत देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन तक्रारवाडी आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांनी केले होते. डॉ. जगताप यांनी तक्रारवाडी उपकेंद्राचा पदभार स्वीकारल्यापासून विविध उपक्रम राबवून शासकीय आरोग्यसेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे.शासनाच्या वतीने सुचविण्यात आलेले विविध उपक्रम त्यांनी आयोजित करुन लोकांमध्ये कोरोना बाबत जनजागृती केली आहे. त्याचबरोबर भिगवण कोविड सेंटरची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे. त्यांनी नुकतेच जागतिक हृदय दिन व फिट इंडिया उपक्रमाचेही आयोजन केले होते. भिगवण कोविड सेंटरसाठी लोकवर्गणीतून विविध साहित्य मिळवून रुग्णांना दर्जेदार सुविधा दिलेल्या आहेत.

या विविध कार्यक्रमांसाठी तक्रारवाडी आरोग्य उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व भिगवण रोटरी क्लब सारख्या स्वयंसेवी संस्था नेहमीच मदतीचा हात देतात एक समाधानाची बाब आहे अशी भावना डॉ. मृदुला जगताप यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *