कितीही डोके आपटा, भाजप आमदार फुटू शकत नाहीत – सुधीर मुनगंटीवार

| मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनेकदा सांगतात की भाजपाचे २० ते २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. तुमच्या सरकारला आता सत्तेवर येऊन १२ महिने झाले. तुम्ही अद्याप भाजपाचा एकही आमदार फोडू शकला नाहीत. तुमच्यात ताकद असेल तर तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही दगडावर कितीही डोकं आपटलं, तरी भाजपाचा एकही आमदार फोडणं तुम्हाला जमायचं नाही, असं थेट आव्हान भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

मागच्या वर्षांत विरोधकांच्या कुंडल्या बघणारे आणि गेल्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केले. भाजपाच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असं भाकित केलं होते. तसेच, भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसची काही नेतेमंडळी वर्षभर करताना दिसत आहेत. या मुद्द्यावरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवर यांनी आघाडीतील नेत्यांना आव्हान दिलं. भाजपाचे जे आमदार राष्ट्रवादीमध्ये येतील, त्यांना पोटनिवडणुकीत जिंकवण्यासाठी तीन पक्ष मिळून एकच उमेदवार देऊ आणि भाजपाचा पराभव करू, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं.

याबाबत मुनगंटीवार म्हणाले, भाजपाचे २० आमदार आमच्या पक्षात येणार असं काही लोकं सांगतात. २० तर सोडाच, पण १२ महिन्याचे १२ आमदारही तुम्हाला फोडता आले नाहीत. आम्ही लिहून देतो की आमचे जे आमदार तुमच्या पक्षात यायला तयार असतील, त्या आमदारांची आणि तुमची मिटींग आम्हीच घडवून देतो. तुम्हाला तुमच्या बळावर खूप विश्वास असला तरी आम्हाला आमच्या विचारांवर आणि निष्ठेवर पूर्ण विश्वास आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.