कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाची, जय्यत तयारी..! कनिष्ठ आमदार बसणार थेट प्रेक्षक गॅलरीत..!

| मुंबई | सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत भरत आहे. दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विधिमंडळ सचिवालयाने जय्यत तयारी केली आहे. विधिमंडळ इमारतीत प्रवेश करणारे आमदार, अधिकारी, पत्रकार या सर्वांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे. या अधिवेशनात शारीरिक अंतर राखण्यासाठी काही आमदारांना चक्क विद्यार्थी व प्रेक्षक गॅलरीत बसवले जाणार आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला येणाऱ्या आमदारांची उद्या शनिवारपासून येथे कोरोना चाचणी करण्यास सुरुवात होणार आहे. आमदारांनी त्यांच्या शहरातील सरकारी प्रयोगशाळांत चाचणीचा अहवाल आणला तरी चालू शकणार आहे. अधिवेशनाला येणाऱ्या आमदारांची राहण्याची सोय थ्री स्टार हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे. ही हॉटेल्स चार दिवसांपुरती आमदार निवास असतील. काही आमदारांची आकाशवाणी आमदार निवासात सोय आहे.आमदारांना विधिमंडळात प्रवेश करण्यापूर्वी एक आरोग्य किट दिले जाणार आहे. त्यामध्ये फेस मास्क, ग्लोव्हज सॅनिटायझर यांचा समावेश असेल.

विधानसभेचे २८८ व विधान परिषदेचे ६० आमदार आहेत. विधान परिषदेतील सर्व आमदारांना सभागृहात शारीरिक अंतर राखून बसण्याची पुरेशी सुविधा आहे. मात्र, विधानसभेतील आमदारांना शारीरिक अंतर ठेवून बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. म्हणून काही आमदारांना प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्ये बसवण्यात येणार आहे. या गॅलरीत बसणाऱ्या आमदारांना माइक, हेडफोन अशा सुविधा पुरवण्यात येणार आहेत. गॅलरीत शक्यतो ज्युनियर आमदारांची म्हणजे पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. विधिमंडळ सभागृहात मध्यवर्ती वातानुकूलित सुविधा आहे. अशा ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असतो. कोराेना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी दोन स्वतंत्र यंत्रे सभागृहात लावण्यात येतील. अल्ट्रा व्हायलेट व ओझोन अशी ती यंत्रे आहेत.

दरम्यान, धोकादायक गटातील म्हणजेच सहव्याधी असणाऱ्या आमदारांनी शक्यतो कामकाजात भाग घेऊ नये, अशी विनंती त्या त्या पक्षाचे गटनेते करणार आहेत. ५० वयाच्या पुढील नागरिकांना कोरोना संसर्गाची अधिक भीती राहते. तसेच सहव्याधी असणारे नागरिक म्हणजेच हृदयविकार, किडनीचे विकार, रक्तदाब, मधुमेह अशा विकारांनी ग्रस्त असणाऱ्या नागरिकांना कोरोना संसर्ग झाल्यास गुंतागुंत होण्याची भीती असते. विधिमंडळात ७० टक्के आमदार हे पन्नास वयाच्या पुढचे आहेत. मात्र, किती आमदार सहव्याधीयुक्त आहेत याची माहिती नाही. सरकार, विधिमंडळ सचिवालय किंवा संसदीय कामकाज सल्लागार समिती आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासंदर्भात निर्देश देऊ शकत नाही. म्हणून ज्येष्ठ तसेच सहव्याधी असणाऱ्या आमदारांनी कामकाजात भाग घेऊ नये हे सांगण्याची जबाबदारी त्या त्या पक्षाच्या विधिमंडळ गटनेत्यावर टाकण्यात आली आहे. कामकाजासाठी उपस्थित राहणाऱ्या आमदारांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारी ठेवण्यात आलेल्या उपस्थिती नोंदवहीमध्ये सही करावी, मात्र शक्यतो कामकाजात भाग घेऊ नये. सभागृहातली उपस्थिती अल्प ठेवावी, अशी विनंती गटनेत्यांकडून करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती निश्चित करण्यासाठी सर्वच पक्ष आपल्या सदस्यांची बैठक घेत असतात. या बैठकीत गटनेते आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ व सहव्याधी असणाऱ्या आमदारांना उपस्थिती अल्प ठेवण्यासंदर्भात सूचना करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या या अधिवेशनात ज्येष्ठ सदस्याच्या उपस्थितीवर मोठी कुऱ्हाड कोसळली आहे.

नाना पटोले यांना कोरोनाची लागण
विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी रात्री पटोले यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली. विधानसभेचे अध्यक्ष अधिवेशन काळात महत्त्वाची भूमिका निभावत असतात. पावसाळी अधिवेशनाला अवघे दोन दिवस बाकी असताना स्वतः अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने मोठी पंचाईत झाली आहे. कोरोना मार्गदर्शक सूचनांनुसार नाना पटोले यांना आता विलगीकरण राहावे लागणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचा भार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *