कल्याण डोंबिवली शिवसेनेला अजून एक धक्का, शिवसेनेचे वाघ, माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे निधन..!

| कल्याण | कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. देवळेकर यांच्या जाण्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवळेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानंतर ते त्यातून बरेही झाले होते. पण या दरम्यान त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी देवळेकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. त्या पूर्वी थेट कोविड सेंटर मध्ये जावून खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी देखील भेट घेऊन देवळेकर यांना धीर दिला होता. मात्र देवळेकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. देवळेकर यांच्या जाण्याने कल्याण डोंबिवलीतील एक अभ्यासू, मनमिळावू आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा लोकप्रतिनिधी गमावल्याची खंत व्यक्त होत आहे. आमचा कर्ता धर्ता जिवलग नेता गेल्याची भावना त्यांच्या मतदारसंघातील नागरिक व एक्का फाउंडेशनचे विश्वस्त योगेश घरत यांनी दैनिक लोकशक्ती शी बोलताना व्यक्त केली आहे.

देवळेकर यांच्या निधनाबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय राजकारणी, लोकप्रतिनिधीनी शोक व्यक्त केला आहे. खरंतर, कोरोनाच्या या संकटात काम करणाऱ्या अनेक नेत्यांना, आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना कोरोनाने वेढलं आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाला हरवण्यासाठी संपूर्ण देश सध्या प्रयत्नात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.