ग्रामपंचायत बिनविरोध करा आणि मिळवा २५ लाखांचे बक्षीस, आमदार लंके यांची घोषणा..!

| पारनेर | राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी रोजी पार पडणार असून, सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर होणार आहे. आमदार नीलेश लंके यांच्या पारनेर – नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींचाही त्यात समावेश आहे. ज्या गावातील नागरीक ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून शासनाच्या खर्च वाचवितील, गावातील एकात्मता कायम राखून प्रशासनावरचा ताण कमी करतील, त्या गावांना आमदार निधीतून २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार लंके यांनी केली आहे.

तालुका पातळीवरील राजकारण करणारे पुढारी गावपातळीवर गटबाजी होवो, अथवा हाणामाऱ्या होवोत. ग्रामपंचायत निवडणूकीकडे सहसा लक्ष देत नाहीत. दोन गट एकमेकांत झुंजले, तरी आपल्या निवडणुकीला ते आपल्या बाजून कसे उभे राहतील, यासाठी ते दोघांनाही गोंजारण्याचे काम करतात. आमदार लंके यांनी मात्र गावागावातील पुढाऱ्यांना थेट आवाहन करून ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध करा, तुम्हाला गावच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी देतो अशी साद घातली आहे.

ग्रामपंचायतींसाठी २५ लाखांच्या निधीची घोषणा केली असून, ते स्वतः निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आतापर्यंत त्यांनी प्रमुख गावांतील गटागटांमध्ये चर्चा करून समेट घडविण्यातही यश मिळविले असून, काही मोठया गावांमधील निवडणूका बिनविरोध होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

विशेषतः ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे वाद होतात. हाणामाऱ्या होतात. त्यातून एकमेकांमध्ये कटूता निर्माण होते. दोन दिवसांच्या निवडणूकीसाठी कटूता निर्माण होऊच नये, सर्वांनी एकत्र बसून निवडणूक बिनविरोध करावी असा माझा आग्रह असल्याचे त्यांनी आमदार लंके यांनी सांगितले.

अतिशय चांगला निर्णय : पोपटराव पवार

राज्याच्या आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांना आमदार लंके यांच्या या आवाहनाविषयी सांगितले, की अतिशय चांगला निर्णय आहे. लंके यांच्या आवाहनामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. गावागावांतील तंटे कमी होतील. गावे एकसंघ राहण्यासाठी आमदार लंके यांनी चांगला उपक्रम हाती घेतला आहे.

भांडणे कमी होऊन विकास होईल : हजारे

आमदार निलेश लंके यांनी हाती घेतलेला हा विषय चांगला आहे. अलिकडेच त्यांची माझी भेट झाली, त्यावेळी त्यांनी माझ्या कानावर हा विषय घातला होता. ग्रामपंंचायतीच्या निवडणुकांमध्ये गटातटांमध्ये भांडणे होतात. सामाजिक तेढ निर्माण होते. राजकिय गट निर्माण होतात. त्या मुळे गावाचा विकास खुंटतो. बिनविरोध निवडणुका झाल्यास भांडणे मिटून गावाच्या विकासाला चालना मिळेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *