गोष्ट ‘ भारत ‘ आणि ‘ INDIA ‘ नावाची..!

‘जपानचे नाव इंग्रजीत जपानच आहे, जर्मनीचे नाव जर्मनीच आहे. फक्त भारताला इंग्रजीत इंडिया म्हणतात. इंडियन हा शब्द आदिवासींसाठी आणि शिवी म्हणून वापरतात. त्यामुळे तो आपण बंद करायला पाहिजे,’ अशा प्रकारचा संदेश अधूनमधून आंतरजालावर फिरत असतो. विशेषत: स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनासारख्या निमित्ताने या देशभक्तीला बहर येतो. व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांतून तर या प्रासंगिक अस्मितेला उधाण येते. खरोखर आपल्या देशाला आपण चुकीच्या पद्धतीने संबोधतो, अशी अपराधाची जाणीव निर्माण करण्याचे काम असे संदेश चोखपणे करतात.

लोकांमध्ये या मुद्द्यावरून एवढा गोंधळ आहे, की काही वर्षांपूर्वी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करून माहिती मागवण्यात आली होती. लखनौच्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणवणाऱ्या उर्वशी शर्मा यांनी तो अर्ज केला होता. अन् तेव्हाही त्यांचा युक्तिवाद हाच होता. ‘आम्ही खूप गोंधळलेले आहोत. जपानचे एक नाव आहे, चीनचे एक नाव आहे; मात्र आपल्या देशाची दोन नावे का आहेत, असे मुले विचारतात,’ असे तेव्हा त्यांनी सांगितले होते.

वस्तुस्थिती काय आहे? मुळात जर्मनी, जपान, चीन किंवा अन्य बहुतेक देशांची आपण घेतो ती नावे आणि त्यांची नावे एकच आहेत, हेच झूठ आहे. स्वतःच्या भाषेतील त्यांची नावे वेगळी आहेत व इंग्रजीत वेगळी आहेत. जर्मनीला जर्मनमध्ये डॉईशलँड म्हणतात, जपानला निप्पोन म्हणतात, तर चीनचे चिनी नाव झोंगू आहे. स्वित्झर्लंडला जर्मनमध्ये श्वाईत्स आणि फ्रेंचमध्ये सुईसे असे पर्याय आहेत. खुद्द इंग्लंडला ब्रिटन, इंग्लंड आणि युनायटेड किंग्डम असे तीन पर्याय आहेत. ऑस्ट्रियाला जर्मनमध्ये ओस्टरराईश म्हणतात, स्पेनला स्पॅनिशमध्ये एस्पाना म्हणतात. त्यामुळे फक्त भारतालाच दोन-दोन नावे आहेत, हा मुद्दा गळून पडतो. थोडक्यात, अमेरिका वगळता बहुतेक सर्व देशांची स्वत:ची व इतरांची नावे वेगळी आहेत.

दुसरा मुद्दा म्हणजे इंडियन या शब्दाचा अर्थ ‘आदिवासी’ असा होतो. इंडियन हा शब्द आदिवासी, मागास या अर्थाने वापरला जातो हे खरे आहे; पण ते अमेरिकेपुरते. अन् त्याला कारणीभूत ठरली ती कोलंबसाची दुहेरी गफलत. हा दर्यावर्दी निघाला होता भारताच्या दिशेने आणि पोहोचला अमेरिकेच्या किनाऱ्याला. अर्थात युरोपीय लोकांना त्या वेळी तो प्रदेशच माहीत नव्हता. त्यामुळे तिथे त्यांना भेटलेल्या लोकांना ते भारत समजले, ही त्यांची पहिली गफलत. त्यांना त्यांनी भारतीय या अर्थाने ‘इंडियन’ असे संबोधायला सुरुवात केली. शिवाय हे लोक आदिवासींसारखे दिसत होते. त्यामुळे त्यांच्यावरून आदिवासींना ‘इंडियन’ हा शब्द रूढ झाला, ही त्यांची दुसरी गफलत.

त्यातही या शब्दाचा अमेरिकेतील वापरही मर्यादित झाला आहे. निग्रो हा शब्द ज्याप्रमाणे आज निषेधार्ह मानण्यात येतो, त्याचप्रमाणे ‘इंडियन’ आणि ‘रेड इंडियन’ हे शब्द अशिष्ट मानण्यात येतात. गोऱ्या लोकांनी केलेल्या स्थानिक लोकांच्या कत्तलीशी त्यांचा संबंध जोडण्यात येतो. त्या लोकांचा उल्लेख करायचाच झाला, तर अपाचे, डेलॅवेअर अशा विशेष नामांनी करण्यात येतो. कोणत्याही प्रतिष्ठित शब्दकोशात अलीकडे हे स्पष्टीकरण दिलेले असते.

हा गोंधळ मुळात इंडिया शब्द पाश्चिमात्य असल्याचे मानण्यावरून उडालेला आहे. इंडिया काय किंवा हिंदू काय किंवा भारत काय, ही विशेष नामे आहेत. त्यातील एकही इंग्रजी नाही. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत हे स्पष्ट म्हटले आहे – ‘इंडिया दॅट इज भारत.’ म्हणजेच ही दोन्ही नावे तेवढीच वैध आहेत.

खरे तर भारतासाठी इंडिया हा शब्द प्राचीन काळापासून प्रचलित आहे. सिंधू (हिंदू) या अर्थाने तो वापरण्यात येतो. प्रचलित समज असा आहे, की हा सिंध शब्द सिंधू नदीवरून आला आहे. परंतु संस्कृतमध्ये सिंधू शब्द समुद्रासाठीही वापरला जातो. त्यामुळे एकीकडे सिंधू नदी ते हिमालय आणि दुसरीकडे समुद्रापासून समुद्रापर्यंत हे भारताचे स्थान ठरले (हिंदुस्थान).

‘हिंदुस्थान’ आणि ‘इंडिया’ ही दोन्ही नावे सिंधू (हिंदू) शब्दावरून आली आहेत. अन् हिंदू हा शब्द कोणीही कधीही शिवी म्हणून वापरलेला नव्हता. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात ग्रीक लेखकांनी ‘सिंधू’साठी ‘इंडोस’ (Indos) हा शब्द वापरला आहे. यातील शेवटचे ‘स’ हे अक्षर प्रथमा एकवचन विभक्ती आहे. ‘इंडिका’ (Indica) आणि ‘इंडिया’ ही नावे याच ‘इंडोस’पासून उत्पन्न झालेली आहेत. चंद्रगुप्ताच्या दरबारातील अलेक्झांडरचा दूत मेगॅस्थनिस याने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव ‘इंडिका’ असे आहे. यात त्याने तत्कालीन भारताचे वर्णन केले आहे. अन् या ग्रंथाचा काळ दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे.
विशेष म्हणजे चिनी लोकांनीही भारतीयांना यिंदू (हिंदू) या नावानेच संबोधलेले आढळते. प्राचीन चिनी ग्रंथांमध्ये भारताची दोन नावे आहेत – ‘तिएन-चू’ आणि ‘इन-तु खो’ किंवा ‘शिन-तु को.’ यातील ‘तिएन-चू’चा अर्थ ‘देवतांचा देश’ असा आहे. त्यानंतर ‘इन-तु खो’ किंवा ‘शिन-तु को’ हेच नाव अधिक लोकप्रिय झाले. ‘शिन-तु’ किंवा ‘इन-तु’ हे नाव उघडच सिंधू या शब्दाचे चिनी रूपांतर आहे. जर्मनमध्ये भारताला इंडियेन (Indien), तर फ्रेंचमध्ये इंदे (Inde) हा शब्द आहे. ही सर्व एकाच शब्दाची वेगवेगळी रूपे आहेत.

दुसरीकडे ‘भारत’ किंवा ‘भारतवर्ष’ हे नाव पौरव वंशाचे सम्राट दौषनिती भरत यांच्यावरून पडल्याचे म्हटले जाते. भरत यांनी चक्रवर्ती साम्राज्य स्थापन केले होते. त्यांनी या देशात राजकीय एकता आणली, म्हणून या देशाला भारत म्हणतात, असे म्हटले जाते. बौद्ध ग्रंथांमध्ये भारतवर्षाला जम्बुद्वीप असे नामाभिधान आहे. परंतु या जम्बुद्वीपात कंबोडियापासून इराणपर्यंतचा प्रदेश होता, हे लक्षात घ्यायला पाहिजे. थोडक्यात, भारत या शब्दाला व्यक्तिवाचक छटा आहे, तर इंडिया या शब्दाला संस्कृतीची छटा आहे.

आता इंडिया या शब्दाचे महत्त्व पाहा. महासागराला नाव असलेला हा एकमेव देश आहे (हिंद महासागर – इंडियन ओशन). जगातील अर्ध्याहून अधिक भाषांचा समावेश असलेले भाषा कुटुंब (इंडो-युरोपीयन) या देशाच्या नावावर आहे. जगातील अर्ध्याहून अधिक भाषा या गटात मोडतात. उपखंडाला नाव मिळालेला हा एकमेव देश आहे (भारतीय उपखंड). इंग्रजीतच सांगायचे झाले तर, शेक्सपीअरने गुलाबाची महती गाताना त्याला कुठल्याही नावाने संबोधले तरी त्याचा सुवास सारखाच आला असता, असे म्हटले आहे. त्याला भारताची माहिती असती किंवा तो भारतात आला असता, तर ‘इंडिया बाय एनी अदर नेम वुड हॅव बीन अॅज ग्रेट’ असेच म्हटले असते.

देविदास देशपांडे ( ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com) (लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *