| जागर इतिहासाचा | इतिहास बदलापूरचा…!

‘बदलापूर’. काही वर्षांपूर्वी एक हिंदी आणि एक मराठी अशा दोन चित्रपटांच्या नावात बदलापूर असल्याने या शहराबद्दल लोकांना थोडी जास्त जवळीक वाटू लागली असावी असं वाटतं. पण माझा मात्र जन्मच बदलापूरचा असल्याने या शहराशी माझं एक प्रकारचं नातं जोडलं गेलं आहे. तसं म्हटलं तर सध्याचं बदलापूर शहर हे मूळ गावापासून सुमारे दीड-दोन किलोमीटर अंतरावर वसलं आहे. उल्हास नदीच्या अल्याड-पल्याड असलेल्या कुळगाव आणि बदलापूर या दोन गावांचच हे आधुनिक रूप.

माझा जन्म १९९१ चा, त्यामुळे माझ्या लहानपणी तरी इथल्या जुन्या बदलापूरच्या खाणाखुणा बघितल्याचं मला स्पष्टपणे आठवतं आहे. अगदी स्टेशनपासू निघणारा एकच मुख्य रस्ता सोडल्यास बाकीचे रस्ते तसे त्यामानाने कच्चेच. आमचं घर तेव्हा जवळपास शहराच्या बाहेर होतं, इतकं बाहेर की दारात उभं राहिल्यावर समोरचा ‘ताहुली’चा डोंगर पायथ्यापर्यंत दिसायचा. आज हेच घर शहराच्या मध्यभागी असल्यासारखं झालंय. माझ्या लहानपणीचे अनेक पावसाळे मी दारात बसून डोंगराकडून घोंघावत येणारा पाऊस बघत घालवले आहेत. समोरून अक्षराशः पावसाचा पडदा आपल्याकडे सरकत येतोय, त्यापूढे पालापाचोळा उडवत धुळीची वावटळ उठते आहे, आणि मग धुंवाधार सरी. पाऊस गेला की मग डोंगरावरून खाली उतरणारे फेसाळ धबधबे. आजघडीला दारातून पूर्ण डोंगर सोडाच, पण ताहुलीच्या केवळ गणेश-कार्तिक सुळक्यांचं दर्शन घडतं तेवढंच. आज बदलापूरात पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल आहे, पण माझ्या आठवणीत रेल्वेलाईन क्रॉस करताना ते जुनं फाटक अजूनही आहे. गाडी गेल्यावर फाटक उघडलं जाणार आणि मग अल्याड-पल्याडहून रूळ ओलांडण्यासाठीची लगबग. रात्री साडेआठ-नऊनंतर बदलापूर चिडीचूप, इतकं की रात्री दहाच्या सुमारास रस्त्यावरून जाताना कुत्रीही गाढ झोपलेली आढळतील. आज हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे माझ्या लहानपणीचं जसं बदलापूर आहे माझ्या मनात आहे तसंच अनेकांच्या मनातही असेल. मग असाच मागोवा घेत गेलो तर बदलापूरच्या इतिहासापर्यंत आपण पोहोचू का?

वास्तविक, या गावाला ‘बदलापूर’ हे नाव कसं याबद्दल लहानपणापासून एक आख्यायिका मी ऐकत आलो आहे. अगदी माझ्या वडिलांपासून ते आसपासच्या जाणत्या लोकांपर्यंत. ‘पूर्वी शिवाजी महाराज मोहिमांवर जाताना इथे थांबून घोडे बदलायचे म्हणून बदलापूर’ अशी काहीशी ती आख्यायिका. अर्थात, त्या लहान वयात ‘महाराज रोज रोज मोहिमेवर आपल्याच गावातून जायचे का, ते दुसरीकडे घोडे कुठेच बदलत नसत का’ इत्यादी बाळबोध प्रश्न त्यावेळी कधीच पडले नाहीत. पुढे पुढे जसजसं वाचन वाढू लागलं तसतसं ‘बदलापूर नावामागच्या आख्यायिकेतील फोलपणा नजरेत येऊ लागला. मला आठवतंय, अगदी आत्ताआत्ताची गोष्ट आहे. मी आणि माझा मित्र रिक्षाने घरी जाताना सहज आमच्या गप्पा चालल्या होत्या, की आपल्या लहानपणी कसं होतं इत्यादी. रिक्षाचालक आमचं बोलणं नक्कीच ऐकत असणार, कारण आम्हाला अडवत त्यांनी, सांगितलं, “आमचं बदलापूर खूप जुनं आहे, शिवाजी महाराज यायचे इकडे, समोरचा तो दिसतो ना तो हाजीमलंगचा किल्ला, तिकडे जायचे महाराज”. खरं सांगायचं तर त्यांच्या या विश्वातून त्यांना खरा इतिहास सांगून धक्का द्यायचा नव्हता म्हणून, पण मनात विचार आला, आजही बदलापुरातली अनेक लोकं हेच समजतात का? समोरच्या ताहुलीच्या डोंगराला अजूनही अनेक बदलापूरकर मलंगगड समजतात. वास्तविक त्याच्या अगदी पाठीमागे मलंगगड आहे, आणि बदलापूरपासून हायवेने अंबरनाथच्या दिशेने जात राहिलं की हळूहळू ताहुलीच्या मागे दडलेला मलंगगड आपल्या नजरेस पडतो. बदलापूरातून एक किल्ला दिसतो, त्याचं नाव ‘चंदेरी’, आणि मलंगगडापेक्षाही हा चंदेरी बदलापूरला जवळचा आहे ही गोष्टही अनेकांना माहित नसेल.

इतिहास असा आहे की शिवाजी महाराज फारतर फार सुरत लुटीच्या वेळेस बदलापूरमार्गे गेले असावेत एवढाच काय तो जुना उल्लेख मिळू शकतो, अथवा कल्याण-भिवंडी जिंकल्यानंतर महाराज इथून गेले असावेत हा एक तर्क. कारण एका सुरत लूटीच्यावेळी मलंगगडावर काही खजिना ठेवल्याचा उल्लेख आहे. पण महाराज त्यावेळी बदलापुरात थांबले, त्यांनी घोडे बदलेले इत्यादी कागदोपत्री पुरावे काहीही नाहीत. होय, एकही पुरावा नाही. मग हे नाव आलं कुठून?

इ.स. १९३३ साली आमच्या बदलापूरचेच असणारे, प्रसिद्ध इतिहास संशोधक कै. नारायण गोविंद उर्फ नानासाहेब चापेकर (पेशवाईच्या सावलीत वगैरे पुस्तकांचे लेखक) यांनी ‘आमचा गाव बदलापूर’ हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केलं. त्यात ते गावाच्या नावाच्या उत्पत्तीविषयी म्हणतात, “बदलापूर हे नाव कशावरून पडले हे निश्चितपणे कळण्यास मार्ग नाही. तर्कच करावयाचा असेल तर या गावी पूर्वी बदले आडनावाचे व्यापारी शिंपी असत, त्यांच्यावरून म्हणजे, बदले यांचे पूर (गाव) ते बदलापूर असे या गावाला नाव पडले असण्याचा संभव आहे. शके १७२७ च्या एका सरकारी कागदावरुन सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वी बदले घराणे येथे होते हे निःसंशय सिद्ध होते. कदाचित बदल्यांचीच जुनी वस्ती येथे असावी.” व्यक्तिशः मलाही चापेकरांनी मांडलेला तर्क जास्त सुसंगत वाटतो.

बदलापुरविषयी विशेष नमूद करावेत असे काही ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख नसले तरी तीन उल्लेख मात्र ठळकपणे सापडतात ते म्हणजे-

पहिला उल्लेख आहे वसईची मोहीम सुरु होताना वासुदेव जोशांनी बाजीराव पेशव्यांना लिहिलेलं पत्रं. वासुदेव जोशींकडे या प्रदेशाचा कारभार सोपवला होता, त्यामुळे त्यांचा वावर सतत इथे असे. वसईच्या मोहिमेचे महत्वाचे आधार आणि कारण असलेले नाईक अणजूरकर यांच्याशी मसलती करण्यासंबंधी हे पत्रं आहे. यात कुळगावचा उल्लेख आहे. “श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामींचे सेवेसी पोष्य वासुदेव जोशी कृतानेक नमस्कार विनंती. येथील कुशल ता| छ २१ जिलकाद मुकाम कुलगाव जाणून स्वकीय लेखनाज्ञा केली पाहिजे विशेष. स्वामींनी आज्ञा केली की कल्याणास जाऊन राजकारण ठीक करून रा| अंताजीपंत व गंगाजी नाईक व भिकाजी नाईक या त्रिवर्गास पाठवावे. त्यास आम्ही स्वामींची आज्ञा घेऊन स्वार जाहलो, ते मौजे दहिवली ता| नीड प|| नसरापूर येथे आलो. तेथे भिकाजी नाईक भेटले. त्यास त्रिवर्गाचा विचार मनास आणून पाठवावे यास्तव भिकाजी नाईक यांस समागमे घेतले. त्यास मार्गी नेरळाजवळी रा| अंताजीपंत भेटले. त्यासही घेऊन मौजे कुलगावास आलो. गंगाजी नाईक कल्याणास होते. त्यांस रातोरात बोलाऊन आणून बोली मनास आणून अंताजीपंत व भिकाजी नाईक यांस स्वामींकडे पाठविले आहे. हे सविस्तर सांगता कळेल. गंगाजी नाईक यांस कल्याणास नेले. यासही मागाऊन दो चौ दिवसा पाठवितो. कळावे याकरिता लिहिले असे”.

दुसरा उल्लेख म्हणजे वसईच्या मोहिमेवर जात असताना चिमाजीअप्पांचा तळ बदलापुरात पडला होता, आणि ठाण्याच्या आघाडीवरील बातम्या अप्पांना बदलापूर मुक्कामी समजत होत्या. त्यात एक उल्लेख आहे तो म्हणजे चिमाजीअप्पांनी बदलापूरच्या मुक्कामी ठाण्याच्या तोफा ऐकल्या. आता आज हा विचार करता हे शक्य कदाचित वाटणार नाही. पण बहुदा बदलापूरच्या उत्तरेकडे कुठेतरी तळ पडला असता किमान पारसिकच्या प्रदेशातून उडवलेल्या तोफांचा आवाज ऐकू येणे त्यावेळच्या निरव, कोणत्याही प्रदूषणरहित वातावरणात शक्य आहे. साष्टीच्या बखरीत तसा स्पष्ट उल्लेख आहे. बदलापूरच्या उत्तरेकडून वळसा घेऊन ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या उल्हास नदीच्या (जी पुढे कल्याणची खाडी म्हणून ओळखली जाते) काठावरून थेट पश्चिमेकडे पाहिले असता निरभ्र आकाशात पारसिकची डोंगररांग दिसते.

तिसरा उल्लेख वसईच्या मोहिमेतला, सरदार पिलाजी जाधवरावांचा आहे. वसईच्या मोहिमेत तोफांच्या सततच्या धुरामुळे पिलाजींच्या डोळ्यांना आणि घश्याला त्रास होऊ लागला. अखेरीस ते वसईतून निघून भिवंडीमार्गे बदलापुरात आले आणि तिथून त्यांनी अप्पांना पत्रं लिहून “मी औषधं वगैरे उपचार करण्यासाठी घरी जातो आहे” असं सांगितलं.

चौथा उल्लेख म्हणजे दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात १७७९ साली मुंबईचा कप्तान गॉर्डन जेव्हा पुण्याच्या फौजांच्या मदतीला जायला निघाला तेव्हा त्याचा आणि मराठी फौजांचा पहिला सामना बदलापुरात झाला. बाजी गोविंद उर्फ बाजीपंतअण्णा जोशी (हे बहुदा मूळचे बदलापूरचेच असावेत अथवा वासुदेव जोश्यांशी यांचा काही संबंध असावा असं वाटतं) हे मराठी फौजांसह कल्याणच्या मुक्कामी जाऊन राहिले होते. कल्याणला गॉर्डन आणि बाजीपंतांच्या फौजांची चकमक होऊन मराठी फौज बदलापूर मुक्कामी आल्या. पुन्हा गॉर्डन बोरघाटाकडे सरकत असताना बदलापुरावर लढाई झाली आणि बाजीपंत घाटाच्या दिशेने मागे सरले. इंग्रजी फौजांचा मुक्काम जवळपास दोन दिवस बदलापुरात होता. शेवटी मराठ्यांनी घाट अडवला हे पाहून विचार करत गॉर्डन पुन्हा कल्याणला गेला, आणि बाजीपंत फौजेसह बदलापुरात परत आले. इंग्रजांच्या धावणीमुळे झालेल्या नाशाबद्द्दल पेशव्यांकडून सरकारी करामध्ये जवळपास सव्वाचार हजार रुपयांची सूट मिळाली. याचा ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख असा-
“इंग्रजाने कल्याण घेतले, त्याचे पारपत्यास बाजी गोविंद फौजेसुद्धा कल्याणावर गेले. इंग्रजांची व सरकारफौजेची (पेशव्यांच्या फौजेची) लढाई होऊन (पीछेहाट होऊन सरकारी) फौजा कसबे बदलापूर येथे येऊन राहिल्या. त्याजवर इंग्रजाने चाल केली. लढाई बदलापुरावर झाली. सरकारफौजा हटोन इंग्रज बदलापुरावर दोन दिवस होता. उपरांत तिसरे दिवशी कल्याणास गेला. सरकारी फौजा फिरोन बदलापुरावरती येऊन राहिल्या. रावताचे व इंग्रजाचे दंग्यामुळे रयत परागंदा जाली, रयतेचा वस्तभाव दाणागला नेला, सबब सूट गावगना रु. ४२१७।।-”. म्हणजे पेशव्यांकडून बदलापूरला करत सूट मिळाली.

अशा काही लहानसहान पण महत्वाच्या ऐतिहासिक मोहिमांच्या घटना बदलापूर आणि कुळगावच्या आसपासच्या प्रदेशात घडलेल्या आहेत. बदलापूरजवळ अडीच किलोमीटरवर असलेल्या देवळोली नावाचं एक लहान खेडं आहे. तिथे कुलुपाच्या आकाराची एक विहीर आहे. हि विहीर, तिच्यावरील शिल्पं आणि एकंदरीत बांधणी पाहता नक्कीच अठराव्या शतकातील आहे हे उघड दिसतं. हि नेमकी कोणी बांधली हे मात्रं आजही सांगता येत नाही. पण विहिरीची ठेवण पाहता कोण्या एका सरदाराने ती विहीर बांधली असावी हे नक्की. चोण परगणा सदाशिवरावभाऊंकडे असल्याचा अंदाज एका पत्रावरून बांधता येतो. त्या पत्रात बदलापूरचा थेट उल्लेख नसला तरी चोण परगण्यातल्या वाल्हवली नावाच्या गावाचा उल्लेख आहे. त्यावरून हा संबंध प्रांत आधी चिमाजीअप्पा आणि नंतर सदाशिवरावभाऊंकडे असल्याचं दिसतं.

बदलापूरच्या पश्चिमेला ताहुलीची भलीप्रचंड डोंगररांग उभी आहे, जी नवरा-नवरीचे सुळके, म्हैसमाळ करत दक्षिणेला चंदेरीच्या अवघड किल्ल्याला जाऊन मिळते. बदलापूर गावापासूनच जवळ असलेल्या, मुळगाव गावानजीकच्या टेकडीवरून वातावरण मोकळं असल्यास आसपासचा संपूर्ण प्रदेश न्याहाळता येतो. पूर्वेला अगदी गोरख-मच्छिन्द्र, सिद्धगडापासून पासून जी डोंगररांग सुरु होते ती आग्नेयेकडून भीमाशंकर, पेठ, ढाक-बहिरी करत राजमाचीला जाऊन मिळालेली व्यवस्थित पाहता येऊ शकते. पश्चिमेला असलेला ताहुलीची डोंगररांग दक्षिणेकडे पसरत जाऊन म्हैसमाळ, चंदेरी, नाखिंड, पेब (विकटगड) पासून माथेरान पर्यंत पाहता येऊ शकते. एकंदरीत पाहता अनेक किल्ले बदलापूरच्या आसपास आहेत. तरीही बदलापूरच्या उल्लेख मात्र शिवकालीन कागदपत्रांमध्ये फारसा आढळत नाही. बदलापूर हे तसं लहानसं खेडं, जवळच्याच चोण नावाच्या मुख्य महालात समाविष्ट होत असे. हा चोण गावही पूर्वी कल्याण सुभ्यात तर नंतर राजमाची सुभ्यात अंतर्भूत होता. नाही म्हणायला इ.स. १६५३ साचा शिवकालीन एक कागद सापडतो त्यात मोरेश्वर गोसावी यांना कोकणातून काही नख्त उत्पन्न वसूल करायचा अधिकार होता, त्यात ‘कालियाण’ म्हणजे कल्याण आणि चोण तरफेच्या बदलापूरचा उल्लेख आहे. मुख्य उल्हास नदीपल्याडच्या सध्याच्या बदलापूर या गावाव्यतिरिक्त सध्याच्या बदलापूर शहरात समाविष्ट झालेल्या अनेक इतर गावांचाही उल्लेख जुन्या कागदपत्रांत सापडतो. एरंजाड, सोनीवली, मुळगाव, कान्होर, देवळोली, शिरगाव, कात्रप, कुळगाव, खरवई, जोवेली, माणकीवली, भोज, दहिवली, चिखलोली, मांजर्ली, इत्यादी अनेक. यापैकी अनेक गावे आज शहराचाच काही भाग आहेत. कुळगाव हे त्यातल्या त्यात मोठं गाव असल्याने कुळगाव-बदलापूर असंच शहराला नाव पडलं आहे. एरंजाड, कान्होर, मुळगाव, देवळोली, चिखलोली, भोज इत्यादी गावे सध्याच्या प्रत्यक्ष शहरात येत नसली तरी आसपास आहेत आणि बदलापुरात राहणाऱ्या प्रत्येकालाच जवळपास माहित आहेत. यातील शिरगावात मध्यंतरी एका शेताच्या बांधावर एक गद्धेगाळ सापडला होता, जो आज बदलापूरच्या पश्चिमेला एका उद्यानात सुखरूप ठेवला आहे. त्यावरून असं स्पष्ट दिसतं की हे शिरगाव अकराव्या शतकातही अस्तित्वात होतं. म्हणजेच, शहर बदलापूरच्या एका भागाचा संबंध थेट एक हजार वर्षे मागे जातो.

ना. गो. चापेकरांचं बदलापूर हे पुस्तक तसं दुर्मिळ आहे, आणि काही जुन्या ग्रंथसंग्रहालयांमध्ये अथवा भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वाचनालयात वाचायला मिळू शकतं. या पुस्तकात चापेकरांनी १९३३ साली लिहिलं, त्यावेळेस असणारी बदलापूरची लोकसंख्या, कोणकोणत्या समाजाची माणसं उदरनिर्वाहासाठी काय करतात इत्यादी सगळं गावगाडा मांडला आहे. याशिवाय शेती, पशुपालन, जंगल, शिक्षण, इतर उद्योग इत्यादी अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. शेवटच्या भागात चापेकरांनी गावाच्या इतिहासाच्या बाबतीत थोडक्यात चर्चा केली आहे. मुख्य म्हणजे जुन्या बदलापूरची काही छायाचित्रं चापेकरांनी दिली आहेत, उदाहरणार्थ बदलापूर गावातला तलाव, जुनं बॅरेज धरण, ब्राह्मणवाडा इत्यादी. याशिवाय मुख्य म्हणजे औंधचे प्रसिद्ध बाळासाहेब श्रीनिवासराव उर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्यासमवेत स्वतः नानासाहेब चापेकर हे होडीतून उल्हास नदी पार करून बदलापूर गावात जात असल्याचं एक दुर्मिळ छायाचित्रही पुस्तकात आहे. बदलापूर या गावाविषयी अभ्यास करू इच्छिणाऱ्यांना आणि आपल्या शहराविषयी जाणून घेऊ पाहणाऱ्यांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक असं आहे.

– कौस्तुभ कस्तुरे, बदलापूर

Leave a Reply

Your email address will not be published.