जागर इतिहासाचा : गुप्तहेरांची गोष्ट – द स्पाय मास्टर (भाग १)

“निदान आता तरी सांगा! तुम्ही ही एवढी सगळी माहिती कुठून गोळा केलीत? त्यांच्या ह्या प्रश्नाचं उत्तर त्याने हसून झटकलं आणि अखेरपर्यंत त्याने ते उत्तर कुणालाच सांगितलं नाही.

१० एप्रिल १९५५, दक्षिण चीनी समुद्रात भारताचं जकार्ता, इंडोनेशियाला जाणारं चार्टर्ड विमान ‘काश्मीर प्रिन्सेस’ कोसळलं. जकार्ता इथे भरणाऱ्या बांडुंग परिषदेसाठी तब्बल सहा देशाचे कर्मचारी आणि पत्रकार एयर इंडियाच्या भारतीय वैमानिकांसह प्रवास करत होते. एकूण १८ प्रवासी आणि त्यातले फक्त तिघेजण वाचलेत. जगातल्या विविध देशातले प्रतिनिधी तसेच पत्रकार ह्या दुर्घटनेत बळी पडलेत. चीनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झोऊ एन्लाय देखील ह्या विमानातूनच बांडुंग परिषदेला जाणार होते, परंतु आयत्या वेळी तब्येत बिघडली म्हणून ते उशिरा गेले आणि वाचले.

बांडुंग, जकार्ता इंडोनेशिया येथे पहिल्या आफ्रो आशियायी परीषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण जग शीतयुद्धाच्या काळात जगत होतं. जगातले नुकतेच स्वतंत्र झालेले, नव्याने निर्माण झालेले देश द्वीध्रुवीय (Bipolar) जगात वाटले गेले होते. पण काही मुठभर देशांना ह्या भांडवलशाही आणि साम्यवादाच्या वादात अडकायचं नव्हतं. दुसऱ्या महायुद्धात होरपळून गेलेल्या जगाला आता तिसऱ्या महायुद्धाची भीती वाटत होती. ह्या पार्श्वभूमीवर आफ्रिका आणि आशियातले वसाहतीच्या दास्यातून मुक्त झालेले काही देश जगात शांतता नांदावी, आणि अधिकाधिक देश वसाहतवादातून मुक्त व्हावेत ह्यावर चर्चा करण्यासाठी परिषदेत जमले होते. पश्च्यात्यांच्या साम्राज्यवादाचा विरोध करणाऱ्या ह्या परिषदेला ब्रिटन, अमेरिकेने नाक मुरडले होते. त्यात ह्या परिषदेचा पुढाकार घेणारे भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरूंनी, चीनचे तत्कालीन प्रीमियर झोऊ एन्लाय यांना ह्या परिषदेला बोलावून ‘साम्यवाद्यांची परिषद’ अशी पाश्च्यात्यांची टीका ओढवून घेतली होती.

विमानस्फोटातून वाचलेले तिघेही कॅबिनेट अधिकारी होते, त्यांच्या मतानुसार हा अपघात नसून विमानात टाईम बॉम्ब लावण्यात आला होता, बॉम्बस्फोटामुळे विमान कोसळले असून हॉंगकॉंग येथे इंधन भरण्यासाठी विमान उतरले असता हा बॉम्ब लावण्यात आला असावा. अधिक तपासांती हा बॉम्बस्फोटच होता आणि तो बॉम्ब अमेरिकन बनावटीचा होता हे उघड झालं. आता ह्या घटनेला राजकीय कटाचा रंग आला. नक्की हा कट कोणी केला, ह्या कटात कोण कोण सहभागी होते ह्यावरून संशयाची सुई सगळ्यांकडे वळू लागली.

ह्या विमानात असलेले विविध देशातले नागरिक, चीनी प्रीमियरचा ह्या विमानातून पूर्वनियोजित प्रवास, विमानाचं हॉंगकॉंग येथे उड्डाण भरणं, ह्याच काळात हॉंगकॉंगचं ब्रिटनच्या अधीन असणं आणि त्यात ब्रिटन आणि चीनचे राजकीय स्तरावर अधिकृत संबंध नसणं. विमानाचं दक्षिण चीनी समुद्रात कोसळणं आणि आणि बॉम्बस्फोट होता हे उघडकीस येणं. ह्या ना त्या अनेक कारणांनी ही घटना जागतिक वादाचं कारण बनली नाही तर आश्चर्यच! पण ह्या सगळ्या परिस्थितीत मधल्यामधे भरडला जात होता तो भारत, कारण ज्या विमानात स्फोट झाला होता ते विमान मात्र भारतीय होतं. अनेक देशाचं ह्या घटनेत सहभाग असण्याने ही घटना फारच किचकट तर बनलीच पण लवकरात लवकर निष्कर्षाशी पोचण्यासाठी जगातल्या त्या त्या देशातले गुप्तहेर कामाला लागले होते.

ह्या वादात आता उघडपणे दोन पक्ष तयार झाले होते. एक चीनचा आणि दुसरा ब्रिटनचा. दोघांनाही ह्या प्रकरणात भारताचा पाठींबा हवा होता. दोघेही अधिकाधिक माहितीसाठी भारताचा पुरेपूर वापर करू पाहत होते. पण भारत द्विधा मनस्थितीत अडकलेला होता, कोणावर विश्वास ठेवायचा आणी कोणावर नाही ह्या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी शेवटी पं नेहरू भारताकडून एक तपास पथक नेमायचं ठरवतात आणि जागतिक स्तरावर ह्या घटनेचं महत्त्व लक्षात घेऊन हे प्रकरण तटस्थपणे हाताळण्यासाठी अशा भारतीय गुप्तहेराला पाचारण करण्यात येतं, ज्याला ५० -६० च्या दशकात जगातला सर्वोत्तम गुप्तहेर गणलं जातं. ह्या गुप्तहेराचे नाव होते स्पायमास्टर रामेश्वर नाथ काव!

क्रमशः

– भारती परांजपे

संदर्भ

१. https://m.timesofindia.com/home/sunday-times/deep-focus/Dj-vu-from-30000-ft/articleshow/45747222.cms

२. https://www.jstor.org/stable/655141?seq=1

३. http://www.chinadaily.com.cn/english/doc/2004-07/21/content_350313.htm

४. https://www.telegraphindia.com/culture/books/r-n-kao-india-s-first-and-foremost-super-spy/cid/1725494

(छायाचित्रात कोट आणि डोळ्याला गॉगल लावलेली व्यक्ती रामेश्वर नाथ काव आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *