जागर इतिहासाचा : गोष्ट गुप्तहेरांची – ब्लॅक टायगर’ (भाग १)

१९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामचा वचपा पाकिस्तान कधीही काढू शकतो ह्याची भारतीय गुप्तचर संघटनेला भीती होती. अशावेळी, पाकिस्तानात जाऊन तिथल्या हालचालीवर लक्ष ठेऊन सगळी माहिती बिनबोभाटपणे पुरवू शकेल अशा हुशार, धूर्त, साहसी देशभक्त असलेल्या गुप्तहेराची भारताला आवश्यकता होती. आणि ती गरज पूर्ण केली रवींद्र कौशिक ह्या विशीच्या तरुणाने. अभिनयाची खूप आवड असणारा रवींद्र अनेक नाट्यसंमेलन किंवा नाट्यस्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. शूर शिपाई, देशभक्त अशा भूमिका साकारायला त्याला खूप आवडायचं. एकदा लखनौ इथे भरलेल्या नाट्यमहोत्सवात त्याची शूर जवानाची भूमिका, ते नाटक पाहायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये भारतीय गुप्तचर संघटनेच्या अधिकाऱ्यांनी पाहिली आणि त्यांनी त्याला खऱ्या खुर्या आयुष्यात शूर देशभक्त व्हायचं असेल तर दिल्लीला ये अशी सुचना केली.

दिल्लीला गेल्यावर पहिल्यांदाच रवींद्र R&AW म्हणजेच Research & Analysis Wing ह्या भारतीय गुप्तचर विभागाबद्दल ऐकत होता. गुप्तचर बनून आपल्या देशासाठी हेरगिरी करून आपण देशसेवा करू शकतो ह्याची त्याला खात्री पटली. पुढे रवींद्रला रीतसर प्रशिक्षण देण्यात आलं. त्याला पाकिस्तानात पाठवण्यात येणार होतं, त्यासाठी त्याला मुस्लीम समाजाचे रीतीरिवाज आणि उर्दू भाषा ह्याचंही प्रशिक्षण देण्यात आलं. गुप्तचर बनण्यासाठी सर्वसामान्यतः लागणारे बरेचसे गुण रवींद्रजवळ होते. कारण रवींद्रचा जन्म १९५२ साली राजस्थानच्या श्रीगंगानगर ह्या सीमालगतच्या भागात झाला. त्यामुळे त्याला पंजाबी भाषा अवगत होतीच त्यामुळे तो खूप सहजपणे पाकिस्तानच्या पंजाबी भाषिक प्रदेशात सरमिसळून जाऊ शकत होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशभक्ती. वडील भारतीय वायुदलात असल्याने लहानपणापासूनच देशभक्तीचं बाळकडू पाजण्यात आलं होतं.

पुढे सर्व प्रशिक्षण संपल्यावर, १९७५मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी रवींद्रला गुप्तहेर म्हणून पाकिस्तानात पाठविण्यात आले. तिथे तो कराची विद्यापीठात नबी अहमद शाकीर या नावाने कायद्याचा विद्यार्थी म्हणून वावरू लागला आणि भारतीय गुप्तहेर विभागाला जी हवी ती कामगिरी पार पाडू लागला. पण नबी अपेक्षेपेक्षा जास्तच हुशार आणि चलाख होता, त्याने जे कारनामे केलेत ते गुप्तहेर जगतात फार धोकादायक मानले जातात आणि अशा घटना फार क्वचितच वेळा घडल्या आहेत. कराचीत कायद्याचं शिक्षण घेत असताना नबीने तिथल्या वर्तमान पत्रात पाकिस्तानी सैन्य भरतीची बातमी वाचली आणि त्याने सैन्यप्रवेशासाठी अर्ज केला व तो कोणत्याही अडचणीशिवाय निवडला गेला. केवळ सैनिक म्हणून नाही तर पुढे त्याला बढती मिळाली व तो पाकिस्तानी सैन्यात मेजर पदाला पोहोचला.

कोणत्याही शत्रूराष्ट्राची गुपिते किंवा संवेदनशील माहिती, त्या देशात सर्वसामान्य नागरिक म्हणून वावरून काढणं वेगळं आणि त्या देशाच्या सरळ सुरक्षाव्यवस्थेत घुसून मिळवणं वेगळं. आणि आपला हेर शत्रूराष्ट्राच्या सैन्यात मोठ्या पदाला पोहचून त्यांची माहिती मिळवतोय यासारखा मोठा आनंद कोणत्या राष्ट्राच्या गुप्तचर संघटनेला होणार नाही? नबीने पाकिस्तानी सैन्यात राहून त्यांची अनेक गुपिते R&AW ला कळवली, पाकिस्तानी सैनिक कधी भारतीय सैनिकांवर हल्ला करणार आहेत हे कळवून कित्येक भारतीय जवानांचे प्राण वाचविले. भारतीय गुप्तचर विभागाच्या सहमतीने नबीने त्याच्या युनिट्समधल्या ऑफिसरच्या अमानत नावाच्या मुलीशी विवाह केला. त्यामुळे त्याच्याबद्दल कोणत्याही संशयाला जागा राहिली नाही.

क्रमशः

– भारती परांजपे

संदर्भ :
१. https://www.dawn.com/news/1334049

२. https://www.telegraphindia.com/1021230/asp/frontpage/story_1526967.asp

३. https://m.economictimes.com/news/defence/story-of-raw-agent-ravinder-kaushik-who-worked-as-a-pakistan-army-major/-the-greatest-spy-of-india/slideshow/58240718.cms

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *