जागर इतिहासाचा : सदाशिव भाऊ पेशव्यांचा तोतया आणि त्याचे बंड..!

तिसऱ्या पानिपत युद्धात चिमाजी अप्पांचे चिरंजीव तथा थोरल्या बाजीरावांचे पुतणे सदाशिवराव भाऊ मराठ्यांचे सेनापती होते. १४ जानेवारी १७६१ ला झालेल्या महासंग्रामात सदाशिवराव भाऊ अब्दालीच्या फौजेकडून मारले गेले. विश्वासराव ( नानासाहेब पेशव्यांचा मुलगा व थोरल्या माधवरावांचा थोरला भाऊ)समरांगणी पाडल्याचे दिसताच भाऊ हत्तीवरून खाली उतरला व घोड्यावर स्वार होऊन अब्दालीच्या सैन्यात शिरला.

अंबारी रिकामी पाहून मराठा सैनिकांची समजूत झाली कि भाऊ मारला गेला, परिणामी त्यांच्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तिसऱ्या दिवशी युद्धात मृत पावलेल्या सैनिकांच्या प्रेतांमध्ये भाऊ चे शिरहीन शरीर मिळाले. शूजाच्या दरबारातील मराठी वकिलांनी त्या मृतदेहाची ओळख पटवून त्यावर यथासांग धार्मिक विधी करून रक्षा कशी येथे गंगेत विसर्जित केली. दुसऱ्या दिवशी ( अंत्य विधीच्या) भाऊचे शिर एका अफगाण सैनिकाकडे मिळाले.

ऑक्टोबर १७६५ च्या सुमारास सदाशिवरावभाऊ सारखा दिसणारा सुखलाल नावाचा एक कनौजी ब्राह्मण आपण सदाशिवराव असल्याचा दावा करत पुण्यात आला. त्याचे दिसणे, वागणे, बोलणे इतके हुबेहूब होते कि प्रत्यक्ष सदाशिवराव पत्नी पार्वती जी भाऊ बरोबर पानिपतला गेली होती,सुद्धा तोतयाला सदाशिवराव भाऊ समजू लागली होती.

पानिपत युद्धातून पुण्यात परत आलेल्यात नाना फडणवीस हि एकच अशी व्यक्ती होती कि जीची त्या युद्धात भाऊसाहेब ठार झाल्याची खात्री होती. नानांनी ह्यात काहीतरी काळबेर असल्याचे वाटून सुखलाल ची चौकशी करून त्याला प्रथम अहमदनगर च्या किल्ल्यात ठेवले व नंतर काही काळाने रत्नागिरीत कैदेत ठेवले. त्यावेळी तेथील किल्लेदार रामचंद्र नाईक परांजपे ने पुणे दरबारातील राजकीय अस्थिरता ( नारायणरावा चा खून,बाल पेशव्याच्या वतीने कारभार बघण्यासाठी बारभाई मंडळी, त्यांच्यातील हेवेदावे, इंग्रजांशी युद्ध,इ.) बघून भाऊच्या तोतयाला १८ फेबुवारी १७७६ ला सोडून दिले.

मुक्तता झाल्या बरोबर ह्या ढोंगी भाऊ ने आपणच सदाशिवराव भाऊ असल्याचे जाहीर करून आसपासच्या प्रदेशात लुटालूट सुरु केली. राघोबाचे बरेच समर्थक तसेच असंतुष्ट सरकारी नोकर पण ह्या तोतयाला येऊन मिळाले. इतकेच नव्हे तर कोंकण किनार्यावरील मराठ्यांचे आरमार पण त्याच्या बाजूस मिळाले. हैदर आली व इंग्रजांनी पण ह्या तोतयाला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. हा तोतया व सदाशिवराव भाऊ मध्ये इतके साम्य होते कि पेशव्यामधील काही जण पण त्यावर विश्वास ठेवून त्याच्या मागे उभे राहिले. त्यामुळे दिवसेंदिवस ह्या तोट्याचा उपद्रव वाढतच गेला.

एकंदर परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन नानाने इंग्रजांशी काही काळ नमते घेण्याचे ठरवून तोट्याचा बंदोबस्त करण्यास प्राधान्य दिले. सरदार भिवराव पानसे ५००० चे सैन्य घेऊन कोंकणात रवाना झाले,त्यांच्या मदतीस महादजी शिंदे पण गेले. तोतया इंग्रजांकडे जाण्याच्या तयारीत असताना रस्त्यात राघोजी आंग्रे नि त्याला पकडले व पुण्यात आणले.

जनतेतील संशय दूर होऊन वस्तुस्थिती जनतेपुढे आणण्यासाठी बारभाई मंडळीनी एक सत्यशोधन समिती नेमली ज्यात प्रसिद्ध न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे पण होते. पर्वतीवर तोतयाने आपण तोतया असल्याचे काबुल केले तसेच आपल्या साथीदारांची नावे पण उघड केली.
सुखलाल ह्या तोतया सदाशिवभाऊ स उंटावर उलटे बांधून पुणे शहरभर फिरवण्यात आले व मेखसुने त्याचे डोके फोडून त्याला मारले ( १८-१२-१७७६).

तोतया सदाशिवरावभाऊ च्या चिंतो विठ्ठल,मानाजी फाकडे,आबाजी महादेव,सदाशिव रामचंद्र आदी लोकांना शिक्षा देण्याबाबत सखाराम बापू व नानांच्या दृष्टीकोनात फार फरक होता.सखाराम बापू उदार,मवाळ विचाराचे होते तर नाना त्याविरुद्ध विचाराचे होते.त्यामुळे नानांनी ह्या लोकांना कठोर शिक्षा ठोठावल्या.

संदर्भ:-

१. मराठ्यांचा इतिहास खंड तीन:- संपादक ग.ह.खरे व अ.रा.कुलकर्णी

२. पेशवाई:- कौस्तुभ कस्तुरे

३. नाना फडणवीस-हिंदी चरित्र:- ले.श्रीनिवास बाळाजी हर्डीकर)

– प्रकाश लोणकर

Leave a Reply

Your email address will not be published.