जर आपल्या वाहनावर ‘ अश्या ‘ पाट्या असतील तर होईल दंड, ठाणे पोलिसांकडून २२ लाखाचा दंड वसूल..!

| ठाणे | वाहनांच्या क्रमांकांना ‘दादा’, ‘मामा’, ‘काका’, ‘नाना’ अशा अक्षरांसारखे आकार देऊन मिरवणाऱ्या वाहनचालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. गेल्या दहा दिवसांत अशा ‘फॅन्सी’ क्रमांक पाटय़ा असलेल्यांकडून पोलिसांनी २२ लाख आठ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून वाहनांना ‘फॅन्सी’ क्रमांकाच्या पाटय़ा बसवण्याचे प्रकार वाढले आहेत. वाहनांच्या क्रमांकांना वेगवेगळी वळणे देऊन त्यांना अक्षरासारखे स्वरूप देऊन वेगवेगळे शब्द तयार करण्याची हौस चालकांमध्ये वाढत आहे. ‘दादा’, ‘मामा’, ‘नाना’, ‘राज’ अशा शब्दांची निर्मिती या क्रमांकांद्वारे केली जाते. मात्र, वाहतूक नियमांनुसार वाहनांवरील पाटय़ांचे क्रमांक स्पष्टपणे आणि दुरूनही समजतील असे असणे आवश्यक आहे. ‘फॅन्सी’ क्रमांकाच्या पाटय़ांमुळे या नियमांचा भंग होतो. केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार अशाप्रकारे वाहन क्रमांक किंवा त्यांच्या पाटय़ांमध्ये छेडछाड करता येत नाही.

वाहन क्रमांकाच्या पाटय़ा या इंग्रजी क्रमांकात असाव्यात असाही नियम आहे. एखादे वाहन परराज्यात गेल्यास तेथील पोलिसांना हा वाहन क्रमांक समजावा यासाठी वाहन क्रमांक हे इंग्रजीत असणे अनिवार्य असते. मात्र, अनेक वाहनचालक या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येते आहे. तसेच एखाद्या फॅन्सी वाहन क्रमांक असलेल्या वाहनचालकाकडून गुन्हा घडला तर त्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे शोध घेणे शक्य होत नाही. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी अशा वाहन क्रमांक असलेल्या वाहनांविरोधात कारवाई केली आहे. तसेच वाहन क्रमांकाची पाटी तुटलेली असणे, इंग्रजीत वाहन क्रमांक नसणे अशा वाहनांवरही कारवाई करण्यात येत आहे. २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या १० दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी १ हजार २१५ वाहनचालकांविरोधात कारवाई केली असून त्यांच्याकडून २२ लाख ८ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

मराठी पाटी बसवा पण नियमात..

एखाद्या वाहनचालकाला मराठीमध्ये वाहन क्रमांक ठेवायचा असेल तर ते तसा क्रमांक बसवू शकतात, परंतु त्यासाठी त्यांना वाहनाच्या दर्शनी भागात मागे आणि पुढे इंग्रजी क्रमांची पाटी बसविणे नियमानुसार बंधनकारक आहे. त्याव्यतिरिक्त ते मराठी पाटीही वाहनाला बसवू शकतात, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.

वाहनचालकांविरोधात करण्यात आलेली कारवाई, नियमांचे उल्लंघन कारवाई दंड :

✓ फॅन्सी वाहन क्रमांक – २०६; २० लाख ६ हजार
✓ वाहन क्रमांकामध्ये चिन्हे १२५; २५ हजार
✓ तुटलेले वाहन क्रमांक ३७३; ७४ हजार ६००
✓ इंग्रजीत वाहन क्रमांक नसणे १७७; ३५ हजार ६००
✓ वाहन क्रमांक चार आकडी नसणे ६५; १३ हजार
✓ वाहन क्रमांकाच्या पाटीच्या आकारात बदल २६९; ५३ हजार ८००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *