जिल्हा शिक्षण समिती सदस्या जयश्रीताई केणी यांनी शाळांना दिल्या भेटी, कासा केंद्रातील विविध शाळांची जाणून घेतली सद्यस्थिती..!

| पालघर |  पालघर जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्या मा. जयश्रीताई संतोष केणी यांनी दिनांक २७ रोजी कासा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरोती, वेती, मुरबाड पागीपाडा, मुरबाड पेंडरपाडा आणि मुरबाड मुरबीपाडा या शाळांना अचानक भेटी देऊन कोरोना काळात सुरू असलेल्या शालेय कामकाज व विद्यार्थ्यांचा ऑनलाइन-ऑफलाइन अभ्यास संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्या समवेत कासा केंद्राचे केंद्र प्रमुख मा. सुरेश भोये सर उपस्थित होते.

दरम्यान पालघर जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्या मा. जयश्रीताई संतोष केणी यांनी सकाळीच जिल्हा परिषद शाळा वरोती येथे भेट देऊन शालेय दफ्तरापैकी पाठ्यपुस्तके वाटप नोंदी, धान्य व धान्यादि वस्तु वाटप नोंदी व अहवाल तसेच शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थिती पत्रक पाहिले. त्याचबरोबर शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचा घेत असलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन अभ्यासाचा आढावाही घेतला. शाळा इमारती व शालेय परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वेती येथे त्यांनी भेट देऊन तेथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांबरोबर चर्चा केली व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

पुढे जिल्हा परिषद शाळा मुरबाड पागीपाडा येथे भेट देऊन शाळेच्या समस्या जाणून घेतल्या. तेथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांसमवेत शाळेला जागा उपलब्ध करणे व नवीन वर्गखोली मंजूर होण्यासंदर्भाने चर्चा केली. तसेच जिल्हा परिषद शाळा मुरबाड पेंडरपाडा येथील एका दिव्यांग विद्यार्थ्याला समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मिळालेली व्हील चेयर विद्यार्थी व त्यांच्या पालकाकडे प्रदान केली.

त्यानंतर अवघड क्षेत्रात असलेल्या जिल्हा परिषद शाळा मुरबाड मुरबिपाडा येथे भेट देऊन त्यांनी कोरोना काळात शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलेल्या शैक्षणिक कामकाजाची माहिती घेऊन शिक्षकांनी ठेवलेल्या नोंदी तपासल्या. यावेळी शाळेतील दिव्यांग विद्यार्थिनी कु. मनीषा चंदर पाडेकर हिला समग्र शिक्षा अभियानंतर्गत मिळालेली थेरपी कीट तिचे पालक श्री. चंदर अन्या पाडेकर यांच्याकडे प्रदान केली. तसेच शालेय परसबाग आणि परिसरात केलेले वृक्षारोपन पाहून शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले. प्रसंगी शाळेच्या परसबागेत त्यांनी टोमॅटो व पपईच्या रोपांची लागवड करून एका गोड अनुभवाचा सुखद धक्का दिला.

✓ “जेव्हा पदाधिकारी आणि अधिकारी शाळेला भेट देऊन केलेल्या कामाचे कौतुक करतात व आवश्यक तिथे मार्गदर्शन करतात तेव्हा काम करण्यासाठी नवा हुरूप येतो. नवी ऊर्जा मिळते. आमच्या ‘बालस्नेहालयाला मा. जि.प.शिक्षण समिती सदस्या जयश्रीताई केणी आणि केंद्रप्रमुख भोये सर यांनी अचानक भेट देऊन कौतुक केल्याबद्दल खूप खूप आभार.”
– श्री. शाहू संभाजी भारती ( बालरक्षक तथा प्रमुख शिक्षक, जि.प.शाळा मुरबाड मुरबीपाडा, ता. डहाणू )

Leave a Reply

Your email address will not be published.