तुम्ही तर महाभारतातील शिखंडी – महापौर किशोरी पेडणेकर

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जमीन व्यवहारासंदर्भात गंभीर आरोप केल्याने भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. किरीट सोमय्या हे फालतू मुद्दा घेऊन पुढे येत आहेत, त्यांना मराठी भगिनीचं कुंकू पुसलं गेले, त्याच्याशी काही देणंघेणं नाही, नाईक कुटुंब मराठी आहेत ते तुमचं कोणी लागत नाही का? अर्णब गोस्वामी तुमचा कोण लागतो? हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांना इशारा दिला होता.

त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबात काय आर्थिक संबंध आहेत? याची माहिती जनतेला द्यावी, हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी याबाबत उत्तर द्यावे असं आव्हान त्यांनी दिलं. त्याचसोबत एसआरए गाळे घोटाळ्यात मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले. याबद्दल किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली आहे.

मात्र किरीट सोमय्या यांच्या आरोपावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घणाघात केली. त्या म्हणाल्या की, किरीट सोमय्यांनी आरोप केले म्हणजे मी आरोपी होत नाही, किरीट सोमय्यांना केवळ आरोप करण्यासाठी नेमलं आहे. कुठलीही जनहित याचिका केली आम्ही त्या सगळ्यांना सामोरं जायला तयार आहोत, त्यांनी आरोप केले त्यावर उत्तर देत बसणार नाही, आम्हाला आमची कामं करून द्यावीत, आरोप करताय ते सिद्ध करावं, दरवेळी आरोप करत बसायचे हे लोकशाहीला धरून नाही. सोमय्या हे महाभारतातले शिखंडी आहेत. उच्च न्यायालयात आम्ही रितसर कागदपत्रे दाखवू. किरीट सोमय्यांच्या मागे लागण्याची गरज नाही. जे आरोप केले ते सिद्ध करावं असं आव्हान त्यांनी दिलं.

किरीट सोमय्यांचा आरोप काय आहे?

एसआरए गाळे हडपले तरीही महापौरांवर कारवाई का केली नाही? ५ मराठी झोपडपट्टीवासियांचे गाळे किशोरी पेडणेकर यांनी ढापले, हे दिसत नाही का? मूळ प्रकरणाला बगल देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न करत आहे. मी पोलिसांपासून सगळीकडे तक्रारी केल्या आहेत, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे कुटुंबाचे संबंध काय? आणखी ९ सातबारा देणार आहे, ३० जमिनीचे व्यवहार उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केले आहेत. आतापर्यंत रश्मी ठाकरेंनी जाहीर केलेले ४० जमीन व्यवहार झालेत त्यातील ३० व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत झाली, या सातबाऱ्यावर ही जमीन लागवडीसाठी योग्य नाही असं लिहिलंय, शिवसेनेत हिंमत नाही म्हणून यावर बोलणार नाही, माझ्या ५ प्रश्नांची उत्तर द्या, म्हाडाची जमीन अनिल परब यांनी लाटली, त्याबाबत तक्रार दिली आहे, रवींद्र वायकरांशी कोणती आर्थिक भागीदारी आहे असा सवाल त्यांनी केला. हिंमत असेल तर माझ्या प्रश्नाची उत्तर द्यावीत, पुरावे चुकीचे असतील तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे, संजय राऊतांनी खुशाल माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करावी, शिवसेनेत हिंमत असेल तर किरीट सोमय्यांना हात लावून दाखवा असं त्यांनी म्हटलं आहे.

“हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं”; किरीट सोमय्यांचं शिवसेनेला खुलं चॅलेंज

फक्त बेछुट आरोप करायचे आणि बदनामी करायची हे किरीट सोमय्यांचे काम आहे, त्यांचे सगळे आरोप होऊन जाऊद्या, त्यानंतर सगळ्या आरोपांना एकसाथ उत्तर देऊ, त्यानंतर आम्ही जे आरोप करू त्याची उत्तरं द्यायला तयारी करावी. दिवाळीनंतर किरीट सोमय्या यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देऊ असं शिवसेना मंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *