त्याने थेट कोरोना मुक्त आजीला उचलून नेले घरी, हॉस्पिटल मागत होते अतिरीक्त बिलाचे पैसे..!

| कल्याण | कल्याणमध्ये रुग्णालयाने डिस्चार्ज देण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना नगरसेवकाने कोरोनामुक्त आजींना रुग्णालयातून उचलून आणल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयाने आजींना बिल भरल्याशिवाय डिस्चार्ज देण्यास नकार दिला होता. यानंतर शिवसेना नगसेवक महेश गायकवाड पीपीई किट घालून रुग्णालयात गेले आणि कोरोनामुक्त झालेल्या आजींना उचलून आणलं.

कल्याण पूर्व येथे राहणाऱ्या आजींना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी कुटुंबीयांनी ८० हजार रुपये जमा केले होते. रुग्णालय प्रशासनाने उपचारासाठी यापेक्षा जास्त रक्कम लागणार नाही असं सांगितलं होतं. पण जेव्हा डिस्चार्ज देण्याची वेळ आली तेव्हा रुग्णालय प्रशासनाने अतिरिक्त ९० हजार रुपये भरण्यास सांगितलं असा कुटुंबाचा आरोप आहे.

कुटुंबीयांनी विनवण्या करुनही रुग्णालय प्रशासनाने डिस्चार्ज देण्यास नकार दिला. शेवटी कुटुंबीयांनी कल्याण पूर्व येथील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडे मदत मागितली. महेश गायकवाड पीपीई किट घालून रुग्णालयात पोहोचले आणि आजींना उचलून रुग्णालयाबाहेर घेऊन आले. यावेळी पोलीसही तिथे पोहोचले होते. रुग्णालयाकडे अतिरिक्त पैसे कशाबद्दल आकारले जात आहेत असं विचारण्यात आलं असता त्यांनी पीपीई किट आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आकारले असल्याचं सांगितलं. पण अखेर पोलिसांच्या मध्यस्थीमुळे प्रकरण शांत झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *