……. तर सुरू होणार लोकल

| मुंबई | मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी संपूर्ण मुंबई अनलॉक करायला तयार असल्याचं म्हटलं आहे. मुंबई अनलॉक करण्याबरोबरच लोकल सेवाही सुरू करण्यास आम्ही तयार आहोत. एमएमआर क्षेत्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यास आम्ही लॉकडाऊन कधीही उठवू शकतो, असं चहल यांनी सांगितलं.

गेल्या दोन महिन्यात मुंबईत दर दिवशी सरासरी १७०० पेक्षा रुग्ण वाढलेले नाहीत. त्यामुळे आम्ही मुंबई अनलॉक करू शकतो. मात्र मुंबईशेजारील एमएमआर क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ते प्रमाण कमी झालं पाहिजे, असं महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले. मुंबईचा रुग्णवाढीचा दर हा केवळ एक टक्का आहे. पण एमएमआर क्षेत्रात रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईप्रमाणेच एमएमआरची रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यास रुग्णवाढीचा दर ६४ दिवसांवर येईल. त्यामुळे आपण लोकल ट्रेनही सुरू करू शकतो, असं चहल म्हणाले.

मुंबईत रेल्वे सुरू झाली असून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना या लोकलमधून प्रवास करण्याची मुभा आहे. तसेच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचा-यांनाही लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. मुंबईची लोकसंख्या २० मिलियन आहे. त्यामुळे शहरात किमान २०० हॉस्पिटल आणि बेड्सची दिवसाला गरज आहे. पूर्वी पेक्षा मुंबईची स्थिती आता खूप चांगली आहे. एमएमआर क्षेत्राची लोकसंख्या दोन कोटी आहे. त्यामुळे एकदा का लोकल सुरू केली तर रेल्वेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल. कल्याण आणि नालासोपा-याहून मोठ्या प्रमाणावर लोक येतील. त्यामुळे एमएमआर क्षेत्रातील परिस्थिती नियंत्रणात आली तर मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व काही सुरू करण्याची विनंती करेल, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *