दारूण पराभवानंतर भारतीय संघात महत्वपूर्ण बदल होण्याचे संकेत …

मुंबई : न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील पराभवामुळे भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय फलंदाजांची या स्पर्धेतली कामगिरी अतिशय निराशाजनक होती. गोलंदाजांनी या मालिकेत चांगले प्रयत्न केले, मात्र फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्यामुळे भारतीय गोलंदाजांचे प्रयत्नही तोकडेच पडले. या पराभवानंतर संघाचा कर्णधार विराट कोहलीला जाग आली असून त्याने आगामी काळात भारतीय संघात महत्वपूर्ण बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

जसप्रीत बुमराह-इशांत शर्मा-मोहम्मद शमी आणि उमेश यादव ही चौकडी सध्या भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करतेय. मात्र न्यूझीलंड दौऱ्यात या गोलंदाजांना म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. भविष्यकाळात तरुण गोलंदाजांना संधी दिली जाईल असे संकेत विराटने दिलेले आहेत. “या मंडळींचं वय आता वाढत जाणार…त्यामुळ भविष्यकाळात असे प्रसंग येत राहणार आणि यासाठी आम्हाला तयार रहावं लागेलं. या गोलंदाजांची जागा कोण घेऊ शकतो हे शोधणं आणि त्यांना योग्य वेळी संधी देणं हे महत्वाचं आहे.”

“माझ्या दृष्टीकोनातून या चारही गोलंदाजांच्या तोडीची कामगिरी करु शकतील असे खेळाडू शोधणं गरजेचं आहे. एखाद्या सामन्यात दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले तर त्यावेळी पोकळी भरुन काढणं अशक्य असतं”, विराट भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलत होता. पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद करणारा इशांत शर्मा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता…त्यामुळे भविष्यकाळात भारतीय संघ व्यवस्थापन कसोटी क्रिकेटमध्ये नवीन गोलंदाजांना संधी देण्याची शक्यता वाढलेली आहे. दरम्यान कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *