नवरात्र निमित्ताने महिलांसाठी ठाकरे सरकारची भेट, उद्यापासून सर्व महिलांसाठी लोकलची सेवा केली सुरू..!

| मुंबई | नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य, नोकरदार महिलांना मोठी आनंदवार्ता दिली आहे. राज्य सरकारने शुक्रवार १६ आॅक्टोबर २०२० रोजी परिपत्रक काढत सरसकट सर्व महिलांना मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. सरकारच्या परिपत्रकानुसार शनिवार १७ आॅक्टोबरपासून महिलांना लोकलचा प्रवास करता येईल.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेला एक पत्र लिहून महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची विनंती केली आहे. राज्य सरकारच्या या पत्रावर मध्य रेल्वेकडून सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे. सरकारच्या विनंतीनुसार आम्ही पावले टाकत आहोत. संबंधित विभागांची मंजुरी मिळताच याबाबत अंमलबजावणी करण्यात येईल, असं मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

सद्यस्थितीत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात खासगी बँकेतील कर्मचारी, वकील, डबेवाले इत्यादींना देखील राज्य सरकारने विशेष परवानगी अंतर्गत लोकल प्रवासाची मुभा देऊ केली होती. गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे अशा दोन्ही मार्गांवर वाढीव लोकलही चालवण्यात येत आहेत. त्यामध्ये महिला विशेष लोकल ट्रेनचाही समावेश आहे.

शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होत आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांसाठी मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे. सणाच्या पहिल्याच दिवसापासून महिलांना लोकल प्रवास करता येईल. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) म्हणजेच ठाणे, कल्याण, नवी मुंबई, कल्याण, कसारा, डहाणूपर्यंतच्या महिला प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते लोकल सेवा सुरु असेपर्यंत सर्व महिलांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल. विशेष म्हणजे हा प्रवास करण्यासाठी या महिलांना इतर प्रवाशांप्रमाणे क्यूआर ( QR) कोडची आवश्यकता नसेल. वैध तिकिटासह महिला प्रवासी प्रवास करू शकतील. सर्वसामान्य पुरूष प्रवाशांना मात्र लोकल प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *