पंतप्रधान मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प शिवसेनेने गुंडाळला..!

| ठाणे | मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव चौथ्यांदा महासभेसमोर मंजुरीसाठी पटलावर आला होता. मात्र वारंवार हा प्रस्ताव कशासाठी आणला जात आहे. असा सवाल भाजपच्या नगरसेवकाने उपस्थित केला असता, तो प्रस्तावच दप्तरी दाखल करण्याचे असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले. एकीकडे ठाण्यात भाजप बुलेट ट्रेनच्या जागा हस्तांतरणाच्या या प्रस्तावावरुन शिवसेनेला अडचणीत आणेल असे वाटत होते. मात्र त्यांच्या नगरसेवकांनी सपशेल नांगी टाकल्याचे दिसून आले. त्यामुळे कोणत्याही स्वरुपाची चर्चा न करता हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी प्रकल्प अखेर सत्ताधारी शिवसेनेने गुंडाळून टाकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा प्रकल्प ओळखला जातो. ठाणे महापालिका क्षेत्नातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) माध्यमातून प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या प्रकल्पात संपादित होणा-या खासगी जमिनींसाठी प्रति हेक्टर ९ कोटी रु पये मोबादला दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच या प्रकल्पात महापालिकेच्या मालकीची शिळ भागातील ३८४९ चौरस मीटर इतकी जागा बाधित होणार आहे. ही जागा प्रकल्पासाठी देण्याची मागणी एनएचएसआरसीएलने गेल्यावर्षी केली होती. तसेच या जागेच्या बद्दल्यात ६ कोटी ९२ लाख ८२ हजार रु पये मोबदला देण्याची तयारी दाखिवली होती. त्यानुसार मोबदला घेऊन ही जागा एनएचएसआरसीएलच्या नावे करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने वर्षभरापुर्वी तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी आतापर्यंत चवथ्या वेळेस महासभेच्या विषय पटलावर ठेवण्यात होता. त्यातही भाजप पहिल्यांदाच या महासभेला हजर राहिल्याने बुलेट ट्रेनच्या या प्रस्तावाला अधिक महत्व प्राप्त झाले होते.

तिकडे मुंबईत मेट्रोच्या कांजुरमार्ग वरील कारशेडला केंद्राने ब्रेक लावल्यानंतर आता त्याचा वचपा काढण्यासाठी सत्ताधारी शिवसेना वाट पाहत होती. त्यानुसार हा प्रस्ताव मंजुरीसाठी येताच, वारंवार हा प्रस्ताव का आणला जात आहे, असा सवाल भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी उपस्थित केला. त्याला भाजपचे इतर नगरसेवक साथ देतील असे वाटत होते. मात्र इतर नगरसेवकांनी यावर कोणतीच भुमिका घेतली नाही. त्यामुळे एक प्रकारे त्यांच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाच्या बाबतीत मौनच बाळगल्याचे दिसून आले. त्यामुळे महापौर नरेश म्हस्के यांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यांच्या या निर्णयामुळे एक प्रकारे मोदी यांच्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचे काम आणि मुंबई मेट्रोच्या कांजुरमार्ग येथील कारशेडचा वचपा काढण्याचे काम ठाण्यात शिवसेनेने केल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *