पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबर पासून..!

| मुंबई | देशात सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या असलेल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे असे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दुस-यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यात सध्या कोरोनाचे संकट असतानाच येत्या ३ ऑगस्टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार होते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पावासाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय मंगळवारी विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठकीत घेण्यात आला.

यंदा पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरु होणार होते. मात्र, मार्च महिन्यापासून राज्यात असणारे कोरोनाचे संकट यामुळे पावासाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन अवघ्या दोन ते तीन दिवसांचा बोलावण्याचा विचार राज्य सरकारचा होता. मात्र, अजूनही राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत नसून, अधिवेशन काळात होणारी गर्दी लक्षात घेता ३ ऑगस्टला अधिवेशन घेणे योग्य नसल्याचा निष्कर्ष कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काढण्यात आला.

विधिमंडळामध्ये काही कर्मचा-यांना सुरक्षारक्षकांनाही कोरोनाची बाधा झाली होती. यामुळे हे अधिवेशन ७ सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय झालेल्या कामकाज सल्लागार बैठकीत घेण्यात आला. ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांना कोरोना लागण झाली होती. एवढेच नाही तर मंत्रालयातील अधिका-यांना देखील कोरोना लागण झाली होती. त्यामुळे अधिवेशनात येणारे मंत्री आणि अधिका-यांची गर्दी बघता राज्य सरकारला कोणताही धोका पत्करायचा नाही. विशेष बाब म्हणजे ७ सप्टेंबरपासून देखील काही निर्बंध घालूनच अधिवेशन घेण्याचा राज्य सरकारचा विचार सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *