बारामतीत होणार भव्य वन उद्यान, अजितदादांची बारामतीकरांसाठी मोठी भेट..!

| बारामती / विनायक शिंदे | बारामतीत १०३ हेक्टरमध्ये वनउद्यान, बटरफ्लाय गार्डन, अँम्पीथिएटर, चिंकारा पार्क, थीम गार्डन होणार आहे. यासाठी कण्हेरी नजीक वनविभागाची जागा निश्चित करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्या संकल्पेतून शहराच्या सौंदर्यात भर पडावी व बारामतीत एक छानसा पिकनिक स्पॉट विकसित व्हावा, निसर्गाच्या सान्निध्यात बारामतीकरांना काही क्षण घालवता यावेत, या उद्देशाने बारामतीत वनउद्यान विकसित केले जाणार आहे.

दादांनी मनावर घेतलं !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून कण्हेरी नजीक वनविभागाच्या १०३ हेक्‍टर जागेमध्ये हे वनउद्यान आकारास येणार आहे. बारामती शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील या क्षेत्रात चिंकाराचा नैसर्गिक अधिवास आहे. याशिवाय ससे, खोकड, खार, लांडगा, तरस, घोरपड हे प्राणी तर गरुड, वेडा राघू, गांधारी, कापशी, तुरेवाला चंडोल, मोर, कावळा, तिकर, टिटवी, पाणकोंबडी, कोतवाल हे पक्षीही मोठ्या संख्येने आढळतात. नीम, सिसू, खैर, हिवर, बोर, बाभूळ, कुसळी या वृक्षांसोबतच माखेल, पवन्या या प्रजातीचे गवतही मुबलक आहे. वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला धक्का न लावता संपूर्ण वनक्षेत्रात वनविकास व पर्यटक आकर्षित होतील, अशी कामे करण्याचे या उद्यानाच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे.

बारामतीचे भविष्यातील आकर्षण असलेल्या शिवसृष्टीच्या नजीक हे उद्यान होणार आहे. या ठिकाणी फुलपाखरांचा मोठा अधिवास असल्याने येथे “बटरफ्लाय गार्डन’ होणार असून तेही भविष्यातील एक आकर्षण असेल. येथे असलेल्या दोन नैसर्गिक तळ्यांचे विकसन करून तेथे बोटींग सुरू करण्याचाही विचार आहे. लहान मुले, प्रौढ तसेच ज्येष्ठ नागरिकांसह प्रत्येक घटकासाठी येथे काही तरी नवीन केले जाणार आहे. वनविभागही या वर काम करीत आहे.

उद्यान कसे असणार?

– स्वागत कमान
– वन्यप्राण्यांसाठी छोटे पाणवठे
– स्थानिक वनस्पती व बांबूचे रोपवन
– गवती ओटे होणार
– जल व मृद संधारणाची कामे
– गॅबियन वॉल
– निसर्ग पायवाट
– वनतलावांचे सुशोभीकरण
– झाडांना ओटे
– चेनलिंक फेन्सिंग
– नैसर्गिक पॅगोडा

उद्यानात काय असणार?

– मधमाश्‍यांच्या अधिवासाची जागा (हनी बी पार्क)
– बटरफ्लाय गार्डन
– विविध कार्यक्रमांसाठी अँम्पीथिएटर
– सर्प उद्यान
– पिकनिक एरिया व रेस्टॉरंट
– चिंकारा पार्क (35 एकर क्षेत्रात)
– थीम गार्डन
– मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *