ब्लॉग : अनिल कुठे आहेस ? मोते सरांच्या प्रेमळ हाकेला मुकलो

हॅलो अनिल, कुठे आहेस बाळा ? मागील १६ वर्षांपासून मोते सरांची प्रत्येक दिवशी दिलेली हाक आता ऐकू येणार नाही. काल सकाळी सरांच्या निधनाची बातमी ऐकली आणि आपसूकच टेबलावरील सरांच्या बनविलेल्या बातम्यांच्या फायलीच्या ढिगाऱ्याकडे लक्ष गेले. २००४ पासून सलग १२ वर्ष सरांच्या प्रत्येक कामाचे, कार्याचे बातमीत रूपांतर करून प्रसारमाध्यमांकडे देण्याचे सरांनी मला काम दिले होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभागाचा संघटनमंत्री व मोते सरांचा प्रसिद्धी प्रमुख अशा दुहेरी भूमिकेतून काम करतांना सरांच्या मुशीत घडलो.

२००४ मध्ये अँड्रॉइड फोन नव्हते. अनिल कुठे आहेस बाळा ? असं म्हटल्यावर अण्णा मी शाळेत आहे, घरी आहे, लोकलमध्ये आहे. ठीक आहे, कागद-पेन हे मुद्दे लिहून घे. सर सांगायचे व मी मुद्दे उतरून घ्यायचो. उल्हासनगर मध्ये सरांच्या व माझ्या घरामध्ये पाच मिनिटाचे अंतरावर होते. त्यांच्या घराजवळच फॅक्सचे दुकान होते. तिथे जाऊन मुंबईतील वृत्तपत्रांच्या कार्यालयांमध्ये सरांची बातमी पाठवायचो. माझी शाळा चेंबूरला सकाळ अधिवेशनात असायची. त्यामुळे सकाळी ५.४० ची लोकल पकडायचो. बरोबर सहाच्या सुमारास सरांचा कॉल यायचा कुठल्या पेपर ला बातमी आहे ? मग त्यांना मी वर्तमानपत्रांची नावे सांगायचो. बातमी मुंबईतून जात असल्याने संपूर्ण राज्यातील आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध व्हायच्या. बातमीत तुझा उल्लेख करीत जा असे सर आग्रहाने सांगायचे. त्यामुळे मोते-बोरनारे ही जोडी शिक्षण विभाग, उपसंचालक, संचालक कार्यालय व मंत्रालयांमध्ये प्रसिद्ध होती. तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र बाबू दर्डा आम्हाला राम-लक्ष्मण ची जोडी म्हणायचे. कालच राजेंद्रबाबूंनी कॉल करून अण्णांच्या आठवणींना उजाळा देत खूप आठवणी शेअर केल्या. मी बनविलेल्या बातमीत आक्रमकता, तीव्रता असायची. विधिमंडळात अनेकदा या बातम्यांचा उल्लेख व्हायचा पण त्यात सत्यता असल्याने कार्यवाही करावी लागे. अनेकदा मंत्री महोदयांच्या रोषाला पण सरांना सामोरे जावे लागत होते पण सरांनी माझ्या कामात कधीच हस्तक्षेप केला नाही. शिक्षकांवरील अन्यायाच्या विरोधात सरांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला.

कोकणात नियमित तर अनेकदा राज्याच्या कानाकोपऱ्यात सरांसोबत प्रवास करण्याचा अनेकदा प्रसंग आला. विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळवण्यासाठी सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी असो, शिक्षकांवरील औरंगाबाद येथील लाठीमाराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व अटकेत असलेल्या शिक्षकांची भेट किंवा मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून अनुदानाचा जीआर काढेपर्यंतचे आंदोलन असो या सर्वच ठिकाणी मोते सरांच्या काया, वाचा, मनाने शिक्षक-शिक्षकेतरांच्या बाबतीतली संवेदनशीलता अनुभवायला मिळाली. शिक्षक परिषदेत काम करीत असले तरी अण्णांचे सर्वच पक्षात मित्र होते. निवडणुकीच्या वेळी अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पक्षांचे आदेश धुडकावून सरांचे काम करीत असत. अण्णा अजातशत्रू होते. शिक्षक-शिक्षकेतर यांच्या प्रश्‍नावर सरांनी कधीही राजकारण केले नाही. मुंबईतील शिक्षक आपले प्रश्न घेऊन येत असत त्यावेळी अण्णा, शिक्षण भवनामध्ये मुद्दाम मला बोलावून या शिक्षकांचे प्रश्न सोडावं असा हक्काने दम द्यायचे. शिक्षणाधिकारी कार्यालयाला पत्रप्रपंच करून शिक्षकांचे प्रश्न सोडवता यावे यासाठी अण्णा असं करीत असत. त्यामुळे मुंबईतील शेकडो शिक्षक माझ्याशी जोडले गेले व संघटना बांधणीसाठी त्याचा मोठा फायदा झाला. प्रश्न सोडविण्याची समज माझ्यात आली. विधिमंडळाचे तालिका सभापती झाल्यावर सर एकदा चेंबूरच्या माझ्या शाळेसमोर येऊन मला कॉल केला. वर्गात असल्याने माझ्याकडून कॉल उचलला गेला नाही. नंतर मी अण्णांना भेटायला खाली उतरलो, पण आधी तुझी शेवटची तासिका पूर्ण कर मग आपल्याला एका कार्यक्रमाला जायचे आहे असे सांगून अण्णा १ तास गाडीतच थांबले. “शाळेत येतांना संघटनेची पाऊलं बाहेर ठेऊन काम करायचे” हा सरांचा मंत्र आम्ही अजूनही जपला आहे.

कल्याण येथील शिक्षक भवनात पहाटेपासूनच शिक्षकांची गर्दी पाहायला मिळत असे. महिला शिक्षकांना ताई नावानेच संबोधल्याने अनेक अन्यायग्रस्त महिला शिक्षकांना आपुलकीचा दिलासा मिळत असे. सरांचा बारा वर्ष प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम करीत असलो तरी सरांचे साहित्यिक सामाजिक व सांस्कृतिक प्रेम जवळून अनुभवले आहे. कोकण मराठी साहित्य परिषद उल्हासनगर शाखेचा मी कार्यवाह होतो. कोमसापचे संस्थापक आणि साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोमसापचे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन उल्हासनगरला घेण्याचं ठरवलं होतं यासंदर्भात उल्हासनगरच्या माझ्या घरी चर्चा सुरू होती. या चर्चेमध्ये डॉ महेश केळुसकर, अशोक बागवे, पू द कोडोलीकर आदी मान्यवरांसह मोते सरांना पण आम्ही आमंत्रित केले होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष मोते सरांना करावं असा प्रस्ताव मी ठेवला असता राज असरोडकर, सुदेश मालवणकर यासह सर्वांनी तो मंजूर केला व दणक्यात तीन दिवसांचे उल्हासनगरच्या टाऊन हॉलच्या वातानुकूलित सभागृहात रसिकांच्या उपस्थितीत ज्यात प्रामुख्याने शिक्षक वर्ग अधिक होता ते संमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले. मोते सरांच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या मैत्रीमुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका व महानगरपालिकांनी सढळ हस्ते मदत केली. यामध्ये विधानपरिषदेचे उपसभापती कै वसंत डावखरे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, संजय केळकर साहेब आदींनी मदत केली होती. उल्हासनगरमधील भाई कोतवाल स्मारक समितीचे कार्यवाह म्हणून काम करताना सरांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले.

श्वास या मराठी चित्रपटाला ऑस्कर मिळवून देण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी या सिनेमाचे विशेष प्रयोगांचे आयोजन केले होते. एक दिवस अण्णांचा दुपारी फोन आला अनिल आपण एका शोचे आयोजन करूया. कर नियोजन. उल्हासनगरच्या व्हीनस सिनेमांगृहात हजारो रुपयांचा निधी आम्ही जमवून श्वासच्या टीमला दिला. राज्यातील सुप्रसिद्ध गायक विठ्ठल शिंदे यांच्या आर्थिक चणचणीबाबत अण्णांना सांगतातच अण्णा मला तडक विक्रोळीला त्यांच्या घरी घेऊन गेले व त्यांना मदत केली. अशा अनेक घटना सांगता येतील. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे सरांच्या कार्याची दुसरी बाजू कळावी हा आहे. दोन दशक सरांसोबत कार्य केल्याने मला शैक्षणिक समस्याची ओळख झाली. प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम करताना राज्यातीलच नव्हे तर देश विदेशातील शैक्षणिक चळवळी अनुभवल्या. माझ्या संघटनात्मक व शैक्षणिक जडणघडणीत सरांचे मोठे योगदान आहे. आज टेबलावर पडलेल्या शेकडो बातम्यांच्या संग्रह असलेल्या फाईलीकडे पाहतांनाच मोबाईकडे लक्ष जाते व अनिल तू कुठे आहेस ? अण्णांची अशी पुन्हा अशी हाक येईल का ? असा आशावादी विचार मनात येतो. अण्णा तुमचे कार्य पुढे नेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली !

– अनिल बोरनारे
( दिवंगत शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचे पूर्व प्रसिद्धी प्रमुख व मुंबई प्रदेश भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *