“भाजप म्हणजे जनतेवर अत्याचार करणारी महामारी आहे..!”

| कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी हाथरस प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. बिर्ला प्लॅनेटोरियमपासून गांधी पुतळ्यापर्यंत केंद्र सरकारविरुद्ध रॅली काढली. यावेळी केंद्र सरकार टीका करताना बॅनर्जी म्हणाल्या, की भाजपा सरकारमध्ये दलित-अल्पसंख्याक आणि शेतक-यांवर अत्याचार होत आहेत. भाजपाच्या हुकूमशाही विरुद्ध बंगालमध्ये प्रत्येक जिल्हा व ब्लॉक स्तरावर आंदोलन केले जाईल.

ममता यांनी म्हटले, की कोविड महामारी आहे, परंतु भाजपा त्यापेक्षाही मोठा धोका आहे. भाजप म्हणजे जनतेवर अत्याचार करणारी महामारी आहे. तृणमूल याला रोखण्याचा हरसंभव प्रयत्न करेल. यावेळी ममता यांनी हाथरस पीडितेच्या कुटूंबीयांची भेट घेण्याचे संकेतही दिले. ममता म्हणाल्या, उद्या मी हाथरसमध्ये पीडित कुटूंबाला भेटू शकते परंतु सरकारला माहितीही होणार नाही. हाथरसची पीडिता आमची मुलगी आहे. जर देशाचे भविष्य चांगले बनवायचे असेल, तर आम्हाला दलित आणि अल्पसंख्याक समुहाची साथ द्यावी लागेल. आज मी हिंदू नाही तर एक दलित आहे.

दोन दिवसापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यूपी पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवले होते.ममतांनी आरोप लावला, की निवडणुकीच्या आधी भाजपा अनेक आश्वासने देते मात्र आपला खरा चेहरा लोकांसमोर आणत नाही.

निवडणुकीआधी भाजपाचे नेते दलितांच्या घरी राहिले, त्याच्या घरचे भोजन केले. मात्र आता दलितांवर अत्याचार करत आहे. हाथरसमध्ये जे झाले ते देशासाठी लज्जास्पद आहे. मार्चमध्ये कोरोना व्हायरस महामारीनंतर ममतांची ही पहिलीच राजकीय रॅली आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.