भारतीय प्रसारमाध्यमे मोदींच्या पाळीव कुत्र्याप्रमाणे वागत आहे, पूर्वाश्रमीच्या भाजप नेत्याचे धक्कादायक वक्तव्य..

 

| नवी दिल्ली | माजी भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी भारतीय प्रसारमाध्यमे ही सरकारच्या बाजूने बोलत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिन्हा यांनी प्रसारमाध्यमांवर टीका करताना, “भारतीय प्रसारमाध्यमे मोदींच्या पाळीव कुत्र्याप्रमाणे वागत आहे,” असं म्हटलं आहे. जानेवारी महिन्यामध्ये सिन्हा यांनी आयोजित केलेल्या गांधी शांती यात्रेचा संदर्भ देत सिन्हा यांनी प्रसारमाध्यमे केवळ सरकारचा अजेंडा आणि धोरणे रेटण्याचं काम करत आहेत असं म्हटलं आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) विरोध करण्यासाठी सिन्हा यांनी काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या सोबतीने यात्रा केली होती. जानेवारी महिन्यामध्ये सिन्हा यांनी भारतामधील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत २२ दिवसांची गांधी शांती यात्रा केली होती. मात्र या यात्रेला प्रसारमाध्यमांनी म्हणावे तितके महत्व दिले नाही अशी खंत सिन्हा यांनी व्यक्त केली आहे. गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिन्हा यांनी प्रसारमाध्ये ही सरकारच्या बाजूने असल्याचा गंभीर आरोप केला आहे. “भारतीय प्रसारमाध्यमे मोदींच्या पाळीव कुत्र्याप्रमाणे वागत आहे. त्यामुळेच सध्या देशात वाईट परिस्थिती सध्या दिसून येत आहे. प्रसारमाध्यमे केवळ सरकारच्या इच्छेनुसार वागत आहेत असं नाही तर सरकारचा अजेंडा रेटण्यासाठी आणि सरकारला काय अपेक्षित आहे याचा अंदाज बांधून काम करत आहेत,” असा आरोप सिन्हा यांनी केला आहे.

२०१४ च्या लोकसभेपूर्वी नरेंद्र मोदींचे नाव पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे अशी इच्छा व्यक्त करणारे सिन्हा हे काही मोजक्या नेत्यांपैकी एक होते. मात्र आपल्या या भूमिकेचा आता पश्चाताप होत असल्याचे सिन्हा यांनी त्यांच्या, ‘इंडिया अनमेड: हाऊ द मोदी गव्हर्मेंट ब्रोक द इकनॉमी’ या पुस्तकामध्ये म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.