मोठी बातमी : या जिल्ह्यातील शिक्षकांनी टाकला ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या मोहिमेवर बहिष्कार..!

| सांगली | महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या मोहिमेवर सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित बहिष्कार टाकला आहे. आज सांगली जिल्हा समन्वय समिती मार्फत शिक्षणाधिकारी यांना निवेदन देवून हा बहिष्काराचा निर्णय कळविण्यात आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने आणि शिक्षण आयुक्तालयाने आदेश देवून देखील शिक्षकांना कोविड कामातून कार्यमुक्त न केल्याने व या कामाच्या संदर्भाने निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी देखील केलेली टाळाटाळ पाहता हा बहिष्काराचा निर्णय सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित येऊन घेतला आहे.

https://twitter.com/thelokshakti/status/1306987876907847682?s=19

काय आहे निवेदनात :

✓ कोविड-१९ आजाराच्या संबंधाने कामकाजासाठी सेवा अधिगृहित केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेशाबाबत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी कळवून देखील त्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी उचित कार्यवाही न करता त्याबाबत आपण सोयीस्कर दुर्लक्ष केलेले आहे.                                           

✓ वय वर्षे ५० वरील बी.पी.,शुगर आणि इतर आजारग्रस्त शिक्षक शिक्षक आहेत त्यानांही वरील विषयान्वये प्रशासनाने आदेशित केले आहे.

✓ कोविड-१९ नियंत्रणासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी माझे कुटुंब-माझी जबाबदारी सर्वेक्षणासाठी शिक्षकांना आदेशित करण्यात आले आहे. सदर मोहिम राबवण्याकरिता संबधित विभागाने महाराष्ट्र शासनाच्या ११ नोव्हेंबरच्या परिपत्रकाचा सोयीस्कर अर्थ लावून शिक्षकांना नाहक त्यामध्ये समावेश करण्याचे अवलंबिलेले धोरण चुकीचे आहे.

✓ तसेच “ज्या शिक्षकांची सेवा कोविड-१९ आजारासंबधित कामकाजासाठी अधिगृहित करण्यात आलेल्या आहेत त्यांना कार्यमुक्त करणे बाबत कार्यवाही करावी” असे शिक्षण विभागाकडून सुचित असूनही माझे कुटुंब-माझी जबाबदारी सर्वेक्षणासाठी शिक्षकांना काम देण्यात आले आहे.

एकंदरीत, राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात असे पडसाद उमटण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता पुढे नक्की काय घडेल , यावर शिक्षणाधिकारी काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आपत्कालीन परिस्थितीतील सेवा हा अजेंडा पुढे रेटून हा बहिष्कार गुंडाळला जातो की काही मागण्या पूर्ण करून मनधरणी केली जाते हे येणारा काळ सांगेल. या बहिष्कारात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथ.शिक्षक व केद्रप्रमुख सभा, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, महाराष्ट्र राज्य उर्दू प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटना, अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना या संघटना सहभागी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *