मंत्री एकनाथ शिंदे यांचे पुन्हा कौतुकास्पद कार्य, महाड दुर्घटनेतील मोहम्मद बांगी व अहमद शेखनाग या चिमुरड्यांचे स्वीकारले पालकत्व..!

| मुंबई | महाड येथील इमारत दुर्घटनेत आई-वडील गमावलेल्या दोन चिमुरड्यांसाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे धाऊन आले आहे. या दोन्ही मुलांचे शिंदे यांनी पालकत्व स्वीकारले असून त्यांच्या खात्यावर प्रत्येकी १० लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येणार आहेत. मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग अशी या दोन लहानग्यांची नावे आहेत.

तब्बल १८ तासांच्या प्रयत्नानंतर मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आले होते. परंतु, त्याची आई आणि भावंडांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. तर, इमारत कोसळत असताना अहमद शेखनाग वेळीच बाहेर पडल्यामुळे बचावला असून त्याचे कुटुंबीय मात्र सुदैवी ठरले नाहीत. या दोन्ही लहानग्यांचे पालकत्व स्वीकारत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दोन्ही मुलांच्या नावे बँक खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील, तसेच त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने उचलण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

या दुर्घटनेचे वृत्त समजताच शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला वेग दिला होता. ठाणे महापालिकेची २ आपत्कालीन पथके आणि अग्निशमन दलाची तुकडीही शिंदे यांच्या आदेशानुसार मदतकार्यात व्यग्र आहे. “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आजही याच तत्त्वानुसार वाटचाल करत आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेच्या भावनेतून या मुलांचे पालकत्व स्वीकारत आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात कुठेही येणाऱ्या संकटकाळात अतिशय सक्षमपणे उभे राहत असतात, त्यांच्या प्रत्येक ठिकाणच्या तत्परतेला आणि माणुसकीच्या भावनेला संपूर्ण महाराष्ट्रातून पक्षापलीकडे जावून दाद दिली जात आहे.

https://twitter.com/thelokshakti/status/1298855257364025345?s=19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *