मराठमोळे कॅप्टन अमोल यादव यांची स्वप्नपूर्ती, भारतीय बनावटीच्या विमानाची चाचणी यशस्वी..!

| मुंबई | सध्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’वर भर दिला जात आहे. अशावेळी भारतासाठी आणि मराठी माणसांसाठी अभिमानास्पद अशी बातमी आहे. अमोल यादव यांनी अथक परिश्रमाने बनवलेल्या विमानाची टेक ऑफ आणि लॅण्डिंग चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता आणखी दोन चाचण्या शिल्लक आहे. त्या झाल्या की विमान सेवेत रुजू होईल. स्वत: अमोल यादव यांनी स्वातंत्र्यदिनी याबाबत घोषणा केली.

विमान तयार झाल्यावर डीजीसीएच्या परवानगीसाठी लागलेला वेळ आणि या प्रक्रियेनंतर विमानाला विमा संरक्षण मिळाल्यानंतर कॅप्टन अमोल यादव यांनी विमानाची यशस्वी चाचणी केली. विमानाची टेक ऑफ आणि लॅण्डिंग चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढची चाचण पूर्ण सर्किटची असेल. त्यानंतर एका विमातळापासून दुस-या विमानतळावर अशी दुसरी चाचणी असेल. त्यानंतर हे विमान सेवेत रुजू होईल, असं अमोल यादव यांनी सांगितलं.

कॅप्टन अमोल यांनी आपल्या चारकोप येथील इमारतीच्या गच्चीवर या विमानाची निर्मिती केली आहे. तर वांद्रे इथल्या ‘मेक इन इंडिया’ प्रदर्शनात या विमानाचं दर्शन घडवलं होतं. तसंच भारतात बनवलेलं हे पहिलं कमर्शियल एअरक्राफ्ट आहे. पुढच्या काही दिवसात ते आकाशात झेपावणार आहे.

संघर्षानंतर डीजीसीएकडून परवानगी
मराठमोळे वैमानिक अमोल यादव यांची मेहनत आणि संघर्ष अखेर फळाला आला आहे. मेक इन इंडिया अंतर्गत बनवलेलं पहिलं ‘मेड इन इंडिया’ ६ सीटर विमानाला डीजीसीएकडून प्रमाणपत्र मिळालं आहे. कॅप्टन अमोल यादव यांनी १९ वर्षांच्या मेहनतीने हे विमान तयार केलं आहे. आता ते उड्डाण आणि चाचणीसाठी तयार आहे. एखाद्या भारतीयाने बनवलेल्या विमानाला ‘स्पेशल परमिट टू फ्लाय’चं प्रमाणपत्र मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं अमोल यादव यांनी सांगितलं.

विमानाच्या नावात नरेंद्र, देवेंद्र…
‘भारतातील विमानं ‘व्हीटी’ने रजिस्टर होतात. त्यानंतरची तीन अक्षरं आवडीनुसार ठेवण्याची मुभा असते. २०११ मी नोंदणीसाठी अर्ज केला होता. परंतु नोंदणीच्या कामात दिरंगाई, ढिसाळपणा दिसला. यामुळे देशाचं बरंच नुकसान झालं होतं. हे विमान २०१६ मध्ये ‘मेक इन इंडिया’मध्ये सादर केलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला, सहकार्य केलं. त्यांच्यामुळे देशाचं मोठं नुकसान टळलं. त्यामुळे विमानाच्या नावातील ‘एनएमडी’ हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचं कॉम्बिनेशन आहे, असं अमोल यादव यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *