महानगरपालिका शिक्षकांना मिळणार सातव्या वेतन आयोगाचा लाभ, नगरविकास विभागाचे आदेश निर्गमित..!

| पुणे / विनायक शिंदे | महाराष्ट्र राज्यातील १७ ड वर्ग महानगरपालिका मध्ये कार्यरत शिक्षकांना सातवा वेतन लागू करण्याविषयी कार्यवाही करण्याचे आदेश नगरविकास विभागाने निर्गमित केले आहेत.

राज्यामध्ये १ जानेवारी २०१९ रोजी १ जानेवारी २०१६ पासून सर्व राज्य कर्मचारी , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांना सातवा वेतन लागू करण्यात आला. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यानाचा वेतनातील फरक ५ वर्षांत ५ हप्त्यामध्ये मध्ये अदा करण्यात येणार आहे, यातील १ हप्ता कर्मचाऱ्यांना अदा देखील करण्यात आला आहे.

महानगरपालिका शिक्षकांना १ सप्टेंबर २०१९ पासून सातवा वेतन आयोग सप्टेंबर २०१९ च्या वेतनातून अदा करण्यात यावा असा आदेश निर्गमित करण्यात आला होता. महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन व वेतन फरकाचा हिस्सा अदा करण्याबाबत नगरविकास विभागाने कळवले असताना धुळे , अहमदनगर, अमरावती, लातूर, सांगली – कुपवाड या ड वर्ग महानगरपालिका वगळता जळगाव, परभणी, नांदेड, कोल्हापूर , अकोला, भिवंडी निजामपूर , चंद्रपूर व अन्य महानगरपालिका मधील प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीचा लाभ मिळत नाही.

या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शिवसेना प्रवक्त्या व विधान परिषदेच्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पत्रव्यवहार केला होता. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी आर .एम. परदेशी यांनी सर्व महानगरपालिका आयुक्त यांना ती कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे. आमदार डॉ.मनिषा कायंदे यांच्या पाठपुराव्याने व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यतत्परतेने महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांना लवकरच सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *