महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा कोरोना बाधीत.!

| मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थकवा व अंगात कणकण असल्यानं ४ ते ५ दिवस अजित पवार होम क्वारंटाईन होते. अजित पवारांना कणकण आणि थोडासा ताप असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. परंतु त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. अजित पवार यांना थकवा जाणवत असल्याने ते घरीच आराम करत होते. मात्र आता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

ते म्हणाले, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन.

दरम्यान, कोरोना काळात देखील ते सतत कामासाठी बाहेर होते. सतत बैठका आणि मंत्रालयात त्यांची उपस्थिती असायची. अलीकडेच त्यांनी अतिवृष्टग्रस्त भागांचा दौरा केला होता. दौरा करून परतल्यानंतर त्यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरीच होते.

त्यामुळे त्यांनी सर्व बैठका देखील रद्द केल्या. अनेक पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले होते. शिवाय एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशावेळी देखील ते उपस्थित नव्हते. अजित पवार नाराज असल्यामुळे कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत अशी चर्चा रंगली. मात्र या चर्चांना खुद्द शरद पवार यांनी पूर्णविराम दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *