मुंबई मनपा ने करून दाखविले..! कोरोना वर मिळवले नियंत्रण..!

| मुंबई | मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून आता ७८ दिवस झाला आहे. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे रुग्णवाढीचा सरासरी दरही कमी होऊन ०.९० टक्के झाला आहे. मुंबईतील एकूण २४ पैकी ४ विभागांत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी शंभरवर असून २ विभागांत तो नव्वदवर, ६ विभागांत ८० वर, तर ५ विभागांत ७० वर आहे. रुग्णवाढीचा सरासरी दरही २४ पैकी १८ विभागांत १ टक्क्यापेक्षा कमी आहे. रग्ण दुपटीचा कालावधी सातत्याने वाढत असून संसर्गावर नियंत्रण मिळाल्याचे ते द्योतक असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई पालिका अनेक प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासूनच अधिकाधिक चाचण्या म्हणजे खंबीरपणे संसर्गावर नियंत्रण, ही बाब केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात आला. प्रभावी उपचारांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले. या दुहेरी कामगिरीमुळे ८८,२९९ रुग्ण कोविडमुक्त झाले असून २१,३९४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील २४ वॉर्डांत वॉररूम सुरू केल्यामुळे रुग्णांना वेळेवर बेड, तत्काळ औषधोपचार मिळणे याचे यशस्वी नियोजन शक्य झाले. ज्यामुळे मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मोठी मदत झाल्याचे पाहायला मिळत आहे. या वॉररूमचे कार्य कसे चालते, हे समजावून घ्यायचे असेल आणि इतर ठिकाणीही त्या तयार करायच्या असतील तर मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषेतील या अवेअरनेस फिल्म पाहाव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

अशा झाल्या चाचण्या :

• ३ फेब्रुवारी रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली. ३ फेब्रुवारी ते ६ मे या कालावधीत १ लाख, तर १ जूनला २ लाख चाचण्यांचा टप्पा गाठण्यात आला.
• १ लाख ते २ लाख हा टप्पा गाठण्यासाठी २५ दिवस लागले. त्यानंतर २४ जूनला ३ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. २ लाख ते ३ लाख हा टप्पा २३ दिवसांत गाठला गेला.
• १४ जुलैला ४ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. ३ लाख ते ४ लाख चाचण्या हा टप्पा २० दिवसांत पार पडला.
• २९ जुलैला ५ लाख चाचण्या झाल्या. ४ लाख ते ५ लाख चाचण्यांचा टप्पा अवघ्या १५ दिवसांमध्ये गाठण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *