… म्हणून त्यांच्या कारभाराबद्दल फार काही बोलता येणार नाही – राज ठाकरेंकडून सरकारच्या कारभाराबाबत भूमिका स्पष्ट

| मुंबई | राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून मातोश्रीवर बसूनच कामे करत होते. यानंतर त्यांनी घराबाहेर पडून राज्यभरात फिरून कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यायला हवी अशी टीका विरोधकांकडून त्यांच्यावर झाली. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांच्यावर टीकास्त्र साधले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मला टीव्हीवरच दिसले. त्यांची कामगिरी दिसली नाही. असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. ज्याचे नेतृत्त्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहे. हे सरकार सत्तेत येऊन जवळपास सहा महिने झाले आहे. त्यांच्या कामगिरीविषयी प्रश्न राज ठाकरेंना मुलाखतीत विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवरच दिसले. मात्र त्यांचा कारभार दिसला नाही. सरकारने कारभाराला सुरुवात केली आणि कोरोना आला. त्यांच्या कारभाराबद्दल फार काही बोलता येणार नाही’ असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरताना दिसतात. मात्र मुख्यमंत्री बाहेर फिरताना दिसत नाहीत यासोबतच तुम्ही सुद्धा घराबाहेर पडला नाहीत? या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, ‘मी बाहेरच असतो, इथे माझ्या कार्यालयात बैठका होतात. मुख्यमंत्री शासकीय पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी बाहेर गेलंच पाहिजे. त्यांना पक्षातल्या लोकांशी बोलायचं नाहीय. त्यांना अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायच्या असतात’ असंही ते म्हणाले आहेत. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे भाष्य केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *