रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ठाण्यात ८९%, देशात दुसरे, पालकमंत्र्यांसह प्रशासनाला यश..!

| ठाणे | गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे देशात रुग्ण बरे होणाऱ्या शहरांच्या यादीत दिल्लीनंतर ठाणे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. ठाण्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने शहराच्या आरोग्य यंत्रणेवरील ताणही काहीसा कमी झाला आहे.

ठाणे शहरातील २३ हजारांहून अधिक नागरिकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. शहरात जून महिन्यामध्ये कोरोनाचा प्रसार सर्वाधिक होता. या काळात शहरातील दाट वस्त्यांमध्ये कोरोना संक्रमण पसरल्याने चिंता व्यक्त केली जात होती. त्यावेळी शहरात दररोज ४०० हून अधिक रुग्ण आढळून येत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थाही अपुरी पडू लागली होती. शहरातील हे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने शुन्य कोव्हीड मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत महापालिका प्रशासनाने शहरातील कोरोना चाचण्या आणि प्रतिजन चाचण्यांची संख्या वाढवून रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यावर भर दिला. हे सर्वेक्षण करण्याचे मुख्य काम मनपा क्षेत्रातील शिक्षकांनी बजावले आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून शहरात दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या २०० पेक्षाही कमी झाली.

याच काळात शहरातील आरोग्य व्यवस्थाही सक्षम झाल्याने कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. २३ हजार रुग्णांपैकी २१ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शहरात सध्या केवळ आठराशे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या जिल्ह्यात १३५३ रुग्ण अॅक्टिव आहेत.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची भूमिका :
या पूर्ण प्रक्रियेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली असून प्रशासन गतिमान केले आहे. स्वतः दिवसरात्र मेहनत घेऊन ते प्रशासनाला सहकार्यासोबत सततचे मार्गदर्शन देखील करत होते. पालकमंत्री बदलावा अश्या आशयाची वक्तव्ये विरोधकांकडून आली परंतु आपल्या सततच्या मेहनतीच्या जोरावर पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा करून दाखवले..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *