राज्यातील शिक्षकांना ऑनलाईन पीएफ स्लीप मिळावी – सुधीर घागस

| ठाणे | राज्यातील शिक्षकाना पीएफ स्लिप मिळत नाहीत. म्हणुन हजारो अनुदानित शाळेतील शिक्षकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे लेख्याबाबत महालेखापाल कार्यालयाकडून भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक कार्यालयाकडून पुरविण्यात येणारी विवरणपत्रे (पीएफ स्लीप्स) ऑनलाईन पद्धतीने मिळावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य सचिव सुधीर घागस यांनी अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा व प्रधान महालेखापाल यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.

शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाच्या अ,ब व क गटातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांकरिता सन २०१९-२० या वित्तीय वर्षापासून भविष्य निर्वाह निधीचे लेखे (पीएफ क्लिप्स) सेवार्थ प्रणाली मध्ये उपलब्ध करणे, अपलोड करणे व प्रिंट काढून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरमहा त्यांच्या पी.एफ.खात्यावरील जमा रक्कम एसएमएस द्वाराही समजते ही बाब अत्यंत समाधान देणारी आहे. परंतु ही सुविधा अनुदानित शिक्षकाना मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शासकीय कर्मचाऱ्यां प्रमाणेच शालार्थ वेतन प्रणाली मध्ये सुद्धा ही सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. सध्या राज्यामध्ये खाजगी अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफ खात्यावरील जमा रकमेचा हिशेब जिल्हा पे युनिट कार्यालयाकडून मिळतो. राज्यातील सर्वच अनुदानित शाळांतील कर्मचार्‍यांची पीएफ स्लिप वेळेवर मिळत नसल्याची तक्रार आहे फ़ंडातील रक्कम ना परतावा अग्रीम काढताना पीएफ स्लिप जोडणे आवश्यक आहे. परंतु कार्यालयांमध्ये असलेली स्टाफ ची कमतरता व अन्य तांत्रिक अडचणीमुळे पीएफ स्लिप वेळेवर मिळत नाहीत.परिणामी संबंधितांस ना परतावा रक्कम वेळेवर उपलब्ध होत नाही. आपल्या हक्काचे पैसे असूनही वेळेवर उपलब्ध न झाल्याने त्याचा काही उपयोग होत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.

अनुदानित शाळांतील कर्मचार्‍यांनाही दरमहा त्यांच्या दिलेल्या मोबाईल नंबर वर पीएफ खात्यातील जमा रकमेचा मेसेज मिळाला तर त्यांस पुढील नियोजन करणे सोयीचे होईल. तसेच दरवर्षी वर्ष अखेरीस शालार्थ वर पीएफ स्लिप काढता आल्यास ना परतावा अग्रीम काढताना येणाऱ्या अडचणी कमी होतील. याकरिता शासकीय अधिकारी व कर्मचारी यांप्रमाणे अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांनाही भविष्य निर्वाह निधीचे लेख्यांबाबत पुरवण्यात येणारी विवरण पत्रे ऑनलाइन पद्धतीने काढून घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी विनंतीही शिक्षणक्रांती संघटनेचे सुधीर घागस यांनी शेवटी विनंती केली आहे.

✓ ” शिक्षकांना ऑन लाईन पीएफ स्लिप मिळत नसल्याने शिक्षक संतप्त आहेत. त्यांना ऑन लाईन स्लीप मिळत नसल्याने पैश्यांचे नियोजन करता येत नाही .त्यामुळे ऑन लाईन पीएफ स्लिप मिळणे गरजेचे आहे.”
– सुधीर घागस, राज्य सचिव, शिक्षण क्रांती संघटना, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *