राज्यात लस सर्वात आधी विद्यार्थी व शिक्षकांना मिळावी..

| मुंबई | संपूर्ण जगासह भारतात देखील कोरोना वरील लस शोधण्याचे संशोधन सुरू आहे. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये केईएम, नायर रुग्णालये आणि पुण्यातील केईएम रुग्णालयात कोरोना लसीवरील चाचणी सध्या सुरू आहे. या चाचणीला यश मिळाल्यास ती कोणाला द्यायची याचा प्राधान्यक्रम सरकारने ठरवलेला आहे. पण ही लस सर्वात प्रथम विद्यार्थी व शिक्षकांना देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य व शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. या सोबतच ठाण्यातील एक्का फाउंडेशनचे अध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील यांनी देखील ठाणे मनपा प्रशासन व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सदरची मागणी केली आहे.

राज्याचा आरोग्य विभाग आणि मुंबई महापालिका यांनी कोविड १९ ची येणारी लस पहिल्यांदा कोणाला द्यायची याबद्दलचे प्राधान्यक्रम ठरवले आहेत. त्यात कुठेही लहान मुलांचा उल्लेख नाही. लस आल्यानंतर शाळा, कॉलेज लवकरात लवकर सुरू करायचे असतील तर सर्वप्रथम फ्रंट लाईन कोविड वॉरियर्ससोबतच शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि लहान मुलांना लस देण्यात यावी. त्याचप्रमाणे कोविड आणि ऑनलाईन शिक्षणाची दुहेरी ड्युटी शिक्षक करत आहेत.

त्यांना शाळेत ५० टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. त्यामुळे आपला जीव धोक्यात टाकत शिक्षक शाळेत जात आहेत. शिक्षकांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यालाही यातून धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, शिक्षक व लहान मुलांना सर्वात प्रथम कोरोना लस देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना लिहिले आहे.

शिक्षकांना शाळेत ५० टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. ही बाब आजाराला आमंत्रण देणारी आणि शिक्षक, त्यांचे कुटुंबीय यांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारी आहे. त्यामुळे सध्या शिक्षकांना शाळा, कॉलेजमध्ये बोलवण्यात येऊ नये. ऑनलाईन शिक्षण व विद्यार्थी, पालक संपर्क ही दोनच कामे त्यांना देण्यात यावीत. कोणतीही अशैक्षणिक कामे देऊ नयेत. याबाबत शिक्षण विभागाला आदेश द्यावेत, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

तसेच ठाण्यात गेली ६ महिने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मनपा व खाजगी शिक्षकांनी देखील प्रामाणिकपणे आपला जीव धोक्यात घालून फ्रंट लाईन वरून कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्यामुळे त्यांना आणि विद्यार्थ्याना लस तर सर्वप्रथम मिळवीच तसेच सोबत मनपाने त्यांचा यथोचित गौरव करावा अशी मागणी देखील त्यांनी आपल्या पत्रातून केली आहे. या सोबत सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करून दिवाळीला दुप्पट बोनस देण्याचे आवाहन देखील एक्का फाउंडेशनचे अध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील यांनी आपल्या पत्रातून केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *