राष्ट्रीय एकात्मतेचे लचांड फक्त महाराष्ट्रालाच सांभाळावे लागते ; सामनातून सेनेचा हल्ला बोल..!

| मुंबई | मध्यप्रदेशात भूमिपुत्रांनाच सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नुकतीच केली आहे. यासोबतच स्थानिक तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या आरक्षित ठेवल्या जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याच कारणावरुन शिवसेनेने सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राने भूमिपुत्रांचा विचार केल्यावर देशाला राष्ट्रीय एकात्मतेची उचकी लागते, देशभरातील सगळ्यांचीच नरडी गरम होतात असा घणाघात शिवसेनेने सामन्यातून केला आहे.

प्रत्येक राज्य हे आपापल्या लोकांची काळजी घेतच असते, पण महाराष्ट्राने ती काळजी घेतली की, देशभरातील सगळ्यांचीच नरडी गरम होतात. मध्यप्रदेशने त्याच राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला, तेव्हा सगळे चिडीचूप कसे आहेत? असा सवाल शिवसेनेने सामनामधून केला आहे.

अग्रलेखातील काही मुद्दे

✓ मध्य प्रदेशात स्थानिकांना नोकऱ्य़ा देण्याचा कायदा आला, तरी दिल्लीसह देशातील राष्ट्रीय एकात्मतावाल्यांचे मन अद्याप डचमळून कसे आले नाही?

✓महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याचा विचार समोर आला, त्या प्रत्येक वेळी एकात्मतेचे सर्वपक्षीय ठेकेदार हे संसदेपासून राज्याराज्यांतील विधानसभेत महाराष्ट्राच्या नावाने ठणाणा करीत उभे राहिले.
✓ प्रत्येक राज्याने भूमिपुत्रांचा विचार करावा. त्यांना रोजगारात प्राधान्य मिळावे हे घटनेनुसारच आहे, पण त्या घटनेनुसार महाराष्ट्राने भूमिपुत्रांचा विचार केल्यावर देशाला राष्ट्रीय एकात्मतेची उचकी लागते. मध्य प्रदेशने त्याच राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला, तेव्हा सगळे चिडीचूप कसे आहेत? हा दुजाभाव शिवरायांच्या महाराष्ट्राला नेहमीच सहन करावा लागला.

✓ भूमिपुत्रांनाच रोजगारात प्राधान्य ही चळवळ शिवसेनेने सुरू केली. ५० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या विचारांची ठिणगी टाकली तेव्हा देशात काय गहजब उडाला होता! प्रांतीयवादी, जातीयवादी, राष्ट्रीय एकात्मतेचे मारेकरी अशी एक ना हजार दूषणे शिवसेनाप्रमुखांना देण्यात आली, पण शिवसेनेने भूमिपुत्रांबाबतची आपली ठाम भूमिका सोडली नाही.

✓ खासगी नोकऱ्य़ांमध्ये ७५ टक्के आरक्षण स्थानिक युवकांना देण्याचा कायदा गेल्या वर्षी आंध्र प्रदेश सरकारनेही केलाच आहे व त्या वेळीही कोणाला राष्ट्रीय एकात्मतेची चिंता वगैरे वाटली नाही.

✓ प्रत्येक राज्य हे आपापल्या लोकांची काळजी घेतच असते, पण महाराष्ट्राने ती काळजी घेतली की, देशभरातील सगळ्यांचीच नरडी गरम होतात. मुंबईसह महाराष्ट्र देशाचे पोट भरते. रोजगार, पोटापाण्याच्या बाबतीत मुंबईची अवस्था ‘आव जाव घर तुम्हारा और खर्चा पानी हमारा’ अशी झाली आहे.

✓ एकटे मुंबई शहर देशाच्या तिजोरीचा २५ टक्के हिस्सा भरते, तेव्हा देशाचा गाडा पुढे सरकतो, पण एखाद्या संकटकाळी महाराष्ट्राने केंद्राकडे मदतीची मागणी केलीच तर मेहरबानीच केल्याच्या थाटात तुकडे फेकले जातात.

✓ आज उत्तर प्रदेश – बिहारात रोजीरोटीची व्यवस्था नाही म्हणून त्या राज्यांतून रोज हजारो मजूर मुंबईकडे पळत आहेत. मध्य प्रदेशने तर दरवाजेच बंद करून ठेवले. त्यामुळे रोजगारासाठी हे लाखोंचे लोंढे पुन्हा मुंबईवरच आदळताना दिसत आहेत. त्यामुळे इतरांनी काखा वर केल्या तरी राष्ट्रीय एकात्मतेचे लचांड फक्त महाराष्ट्रालाच सांभाळावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *