लॉकडाऊन काळातील समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन बृहन्मुंबई महानगरपालिकेने तात्काळ अदा करावे – तानाजी कांबळे

| मुंबई | कोरोना विषाणूचा प्रसार राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी/ कर्मचारी यांना कोरोना चा संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाऊन १ अंतर्गत राज्य शासनाने वेळोवेळी विविध प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत. राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाउन १ अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या वाहतुकीवर प्रतिबंधात्मक मर्यादा घालण्यात आल्या होत्या. संपूर्ण देशात कोरोना विषाणू चा वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती व प्रवासावरील निर्बंध लक्षात घेता वर्क फ्रॉम होम ला प्राधान्य देण्यात आले होते.

लॉकडाउन कालावधीत कार्यालयात येण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वाहतुकीचे साधन उपलब्ध नसल्या कारणाने समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहू शकले नाहीत. लॉकडाउन कालावधीत कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन कपात न करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत 132 पैकी 115 ते 120 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन मिळालेले नाही. एप्रिल महिन्यात मिळालेले वेतन नोव्हेंबर महिन्यापासून २० टक्के अनुसार सलग पुढील पाच महिने कपात करण्याचा ठराव बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मंजूर केला आहे.

लॉक डाउन काळात कोणतेही वाहतुकीची सुविधा नसताना, कोरोनाचे संक्रमण मुंबईत प्रचंड वाढलेले असतानाही समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थिती नसल्याने एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन कपात करण्याचा अजब निर्णय माननीय मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि शिक्षण विभागाने घेतल्याबद्दल प्रसिद्धीप्रमुख श्री युवराज कलशेट्टी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.

लॉकडाउन १ च्यावेळी सर्व कार्यालयात बंद होती, जी कार्यालये चालू होते तेथे उपस्थिती काही टक्क्यांपर्यंत नियंत्रित करण्यात आली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम ची सवलत देण्यात आलेली होती. लॉक डाऊन काळात कोणत्याही कर्मचाऱ्यांची कपात न करण्याचे आदेश असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने घेतलेला अनागोंदी निर्णय अत्यंत चुकीचा आहे, असे मत मुंबई अध्यक्ष श्री.तानाजी कांबळे यांनी व्यक्त केले.

समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांना एप्रिल आणि मे महिन्याचे संपूर्ण वेतन देण्यात यावे या मागणीसाठी निवेदन मा.शिक्षणमंत्री, मा. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, मा. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी, समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद राज्य प्रकल्प संचालक श्रीमती वंदना कृष्णा यांना देण्यात आले असून मागणी पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे श्री. तानाजी कांबळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.