लॉकडाऊन होणार की नाही..? उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे मोठे वक्तव्य..!

| पंढरपूर | गेल्या आठ महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन होता. या काळात गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांचे हाल झाले आहेत. कोरोनासह आपणाला जगावे लागणार आहे. लोकांनी शारीरिक अंतर राखण्याबरोबरच मास्क आणि सॅनिटायझरचा नियमितपणे वापर करणे आवश्यक आहे. यापुढे लाॅकडाऊनचे नाव काढू नका, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्र्यांनीच गत आठवड्यात लाॅकडाऊनचे संकेत दिले होते, परंतु आठवडाभरानंतर त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे पुन्हा लाॅकडाऊन होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त गुरुवारी पहाटे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा झाली. महा पूजेनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पवार म्हणाले, गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची अवस्था फार बिकट झाली आहे. दररोज काम केले तरच त्यांचे घरदार चालते. सततच्या लाॅकडाऊनचा फटका सर्वसामान्य आणि गरीब लोकांनाच बसतो. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या-ज्या वेळी लाॅकडाऊन घोषित केले तेव्हा हा आदेश सर्वांनी पाळला आहे. वारकरी संप्रदाय समंजस असून काही महाराज मंडळींनी वेगळी भूमिका घेतली होती तरीही त्यांच्या भूमिकेस राज्यातील वारकऱ्यांनी पाठिंबा दिला नाही. कोरोनामुळे केंद्र व राज्यात कर जमा होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने दिलेल्या निधीचा योग्य वापर होत नसेल तर कारवाई करावी लागेल, अशी तंबी पवारांनी या वेळी दिली.

मुख्यमंत्रिपदाबाबत… जे दिलंय त्यात समाधान मानावे
तुम्ही आषाढीची पूजा कधी करणार? या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. त्यामुळे पांडुरंगाने जे दिलंय त्यात समाधान मानावे आणि पुढे चालावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *