व्यक्तिवेध : आधुनिक काळातील संत वै. ह. भ. प. विनायक अण्णा कोंढरे

संपूर्ण जगभर कोरोनाने हाहाकार उडाला आहे. सकाळीच कोरोनामुळेच अनंतात विलीन झालेले, क्षेत्रीय मराठा वारकरी दिंडीचे वंशपरंपरागत विणेकरी आणि आमचे काका प्रा .अशोक जी मांगडे यांच्या दशक्रिया विधी उरकून घरी आलो आणि तेवढ्यात विनायक आण्णांच्या जाण्याची बातमी कळली. आंघोळ करता करतात संपूर्ण अंग गलीत गात्र होऊन गेले. कानावर विश्वास बसत नव्हता. दोन दिवसापूर्वीच अण्णांचे बंधू अप्पा यांचे निधन कोरोणामुळे झाले होते. आणि आज आण्णाची ही दुःखद वार्ता , संपूर्ण जीवन पट डोळ्यासमोरून सरकत राहिला…

हिमालयाच्या उंचीचा माणूस किंबहुना हिमालयच तो डोळ्यासमोरून जाता जाईना.. धिप्पाड देहयष्टी, डोक्यावर राज मुकुटप्रमाने शोभावी अशी कांजी केलेली धारदार वारकरी टोपी, सुवासिनींनी सौभाग्याचां मळवट भरावा असा त्या विशाल कपाळावर ल्यालेला अबीर बुक्का, करारी बाणेदार नजर आणि तरीही डोळ्यातून सहज जाणवनारा अंतःकरणातील ओलावा, रुबाबदार चेहरा, भजन अभंग गाताना अगदी सिंह गर्जनाच करतोय असा भासायचा, कुबेराची संपत्ती पायाशी लोळण घेत असतानाही सुवर्णलांकरापेक्षा गळ्यामध्ये रुळणाऱ्या तुळसी मालानी कंठ फुलून दिसायचा, पांढरी शुभ्र कपड्यातून शुद्ध निष्कलंक जीवन झळाळून निघायचं. आत्मा अविनाशी आहे हे सत्य आहे तरी देखील ज्या पवित्र देहात त्याने वास केला त्या नाम रूपाला आम्ही पारखे झालो.

क्षेत्रीय मराठा सस्था, अद्वैत वारकरी भजनी मंडळ, ९७ क्रमांकाची दिंडी, कात्रज आणि पुणे परिसरातील सर्वच वारकऱ्यांचे श्रद्धास्थान गुरुवर्य जंगले माऊली, निष्काम, निर्मोही महात्मा सुद्धा अण्णांच्या जाण्याने हेलावला” आज अतीव दुःख मला होत आहे, माझा उजवा हात गेला.” या दोनच वाक्यात जंगले माऊली नी आपले तीव्र दुःख व्यक्त केले. वस्तुस्थिती हीच आहे “मरावे परी कीर्ती रुपी उरावे” या न्यायाने अण्णांच्या कार्याची महती यावच्चंद्रदिवाकरौ तोपर्यंत राहील यात शंका नाही.

उटीच्या भजनामध्ये, पंढरपूरच्या पायी दिंडीमध्ये, सप्ताहात परिसरातल्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये अण्णांच्या असण्याने शिस्त, संयम आणि भारदस्तपणा आपसूक जाणवायचा. संपूर्ण गाथा मुखोद्गत, शुद्ध सांप्रदायिक चालीचा खजाना, पहाडी आणि तितकाच टीपेत सहज वरच्या सप्तकात जाणारा आवाज, प्रत्येकाची योग्य नोंद आणि प्रत्येकाला संधी ही सर्व अण्णांनाच साधायचं. वारकरी संप्रदाय सामाजिक कार्यातील छोटा मोठा कोणी असो त्याला सन्मान आदर आणि त्याबरोबरीने वडिलकीचा आधार प्राप्त होण्याचे ठिकाण विनायक अण्णा..

तरुण कीर्तनकार, अभ्यासू व्यक्ती, संगीताचा उपासक म्हणून माझ्याविषयी अण्णांना पोटच्या पोराप्रमाणे प्रेम, जिव्हाळा वाटायचा. माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला ना चुकता हजर असायचे. व्यासपीठावर त्यांची उपस्थिती म्हणजे संपूर्ण सभागृह भरून वाटायचं. २०१७ साली आमच्या संस्थेच्या वतीने वारकरी भूषण पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यावेळी त्यांचे भाऊक भाषण, कृतज्ञतापूर्वक मानलेले आभार, त्या कणखर डोळ्यातून सुद्धा पाजरलेले आनंदाश्रू त्यांच्या महान व्यक्तित्वाची प्रचिती घडवून देत होते.

सुपुत्र विशाल आणि सुधीर ” जोडोनिया धन उत्तम व्यवहारे” या अण्णांच्या आदर्श अनुसार व्यवसायात उत्तुंग प्रगती करत आहेत, स्नुषा सौ स्मिताताई कोंढरे पुण्यनगरी च्या विद्यमान नगरसेविका असतानाही अण्णांच्या ना कुटुंबातील कोणाच्याही वर्तनात तो अविर्भाव कधी जाणवला नाही…” लाज भय शंका दुरवीला मान ! नकळे साधन-या परते !!” या न्यायाप्रमाणे ” गायनाचे उडे आपुलिया छंदे ! मनाचे आनंदे आवडीने !!” , समृद्ध वारकरी, समाजशील व्यक्तिमत्व, गोरगरिबांचे कैवारी म्हणून आदर्शवत जीवन जगून नरदेहाची चरण सीमा अण्णांनी प्राप्त केली.

“देव पहावयास गेलो! तेथे देवाची होऊन ठेलो !!” या सिद्धांतानुसार भगवत स्वरूपाला प्राप्त अशा वैकुंठवासी अण्णांच्या पवित्र स्मृतीला साष्टांग प्रणिपात..

– गणेश महाराज भगत ,पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *