कोणाही मराठी भाषिकाला खूप अभिमान वाटावा अशी एक महत्त्वपूर्ण घटना १९७४ मध्ये मराठी साहित्यजगात घडली. मराठीतील थोर साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर ऊर्फ भाऊसाहेब खांडेकर यांच्या ‘ययाति’ या कादंबरीला सर्वश्रेष्ठ भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार १९५८ ते १९६७ या कालावधीत भारतीय भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या सर्जनात्मक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती म्हणून ‘ययाति’ कादंबरीसाठी घोषित करण्यात आला. मराठी साहित्याचा प्रथमच अशा प्रकारे सन्मान झाला. मराठी भाषेचा, लेखकांचाही बहुमान झाला. आज त्यांची पुण्यतिथी त्या निमित्ताने..!
११ जानेवारी १८९८ रोजी पौषात अंगारकीला, सांगली येथे खांडेकरांचा जन्म झाला. त्यांचे नाव ‘गणेश’ ठेवण्यात आले. त्यांचे बालपण, शालेय शिक्षण सांगलीत झाले. त्यांचे वडील आत्मारामपंत हे त्या वेळी सांगली संस्थानात मामलेदार होते. सुप्रसिद्ध नाटककार गोविंद बल्लाळ देवल हे खांडेकरांच्या वडिलांचे मित्र होते. देवलांची नाटके, त्यांच्याकडील अनेक पुस्तके खांडेकरांनी लहानपणीच वाचली. लहानपणापासूनच त्यांना वाचनाचे आणि क्रिकेटच्या खेळाचे वेड होते.
‘लेखक म्हणून प्रसिद्ध होण्याची आणि मासिकात आपलं नाव छापून आलेलं पाहण्याची इच्छा बालपणी जेव्हा प्रथम माझ्या मनात उद्भवली, तेव्हा माझ्या लेखावरती छापलेलं गणेश आत्माराम खांडेकर हेच नाव मी माझ्या बालिश स्वप्नांत पाहत आलो होतो. ‘एका पानाची कहाणी’ या आत्मकथनाची ही सुरुवात. १८९८ साली मिळालेलं हे नाव १९१६ त पुसलं गेलं आणि त्यानंतरचे सारे लेखन प्रसिद्ध होत गेले ते वि. स. खांडेकर या नावानं. वि. स. खांडेकर झाल्यामुळे सांगलीला किंवा सांगलीशी संबंध असलेल्या पुण्या-मुंबईत राहून मी ज्या प्रकारचा लेखक झालो असतो, त्यापेक्षा अगदी निराळय़ा प्रकारचा लेखक झालो ही गोष्ट खरी आहे. हे शब्द आहेत सांगलीत जन्मलेल्या गणेश आत्माराम खांडेकर ऊर्फ विष्णू सखाराम खांडेकर तथा भाऊ खांडेकर यांचे.
भाऊंचे वडील आत्मारामपंत हे मूळचे सावंतवाडीचे. मात्र कौटुंबिक कलहामुळे ते भरल्या पानावरून उठले. ते, पुन्हा त्या घराचं तोंड पहायचं नाही, या निर्धारानं. अत्यंत रागीट स्वभावाच्या या माणसांची भाऊंना कधी भीती वाटली नाही. त्यांच्या मायेचा गारवा (जेमतेम चार वष्रे) भाऊ अखेपर्यंत विसरले नाहीत. बालवयातील आजारपणात भाऊंनी आंबा खाण्याचा हट्ट केला. ताप उलटेल म्हणून आईनं आंबा खाऊ दिला नाही.
पण कोकणशी घट्ट नाळ जोडलेल्या त्यांच्या वडिलांना ‘हापूस आंबा कोणत्याही विकारात खाल्ला तरी बाधत नाही, याची कल्पना होती. कुणीतरी आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करावा,’ असं माणसाला लहानपणापासून वाटत असावं. प्रेमाच्या पुरात बुडून जाण्यात एक निराळाच आनंद असतो, भाऊंना त्या दिवशी आंबा खाल्ल्यावर कळलं.
भाऊंचा जन्म सांगलीला झाला असला तरी ‘आमचे घर’ असा उल्लेख ते आपल्या सावंतवाडीतील घराचाच करतात. मात्र, वडिलांच्या हयातीत हय़ा घराचा संपर्क आला नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊंच्या संमतीविना किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता भाऊंना दत्तक देण्याचा घाट आप्तांनी घातला. अपरिचीत प्रदेशात, अपरिचीत माणसांत एकदम राहावं लागणार या विचारानं भाऊंचे मन अस्वस्थ झाले होते. पण सांगली सोडून जावे लागेल म्हणून हळवेही झाले नव्हते.
जन्मदात्या आईकडून भरभरून नसले तरी साध्या प्रेमाची, मायेची अपेक्षाही कधी पूर्ण होऊ शकली नाही. इतरांच्या इतकीही आईविषयी ओढ वाटत नसली तरी पैशाच्या अभावी तिचे हाल होऊ नयेत, असे भाऊंच्या राहून राहून मनात येई. लहान भावावर-शंकरवर त्यांचा जीव होता. दत्तक होणं हा आर्थिक दुरवस्थेतून सुटण्याचा आणि आपलं शिक्षण व जबाबदा-या पूर्ण करण्याचा सुलभ मार्ग आहे, या विचारानंही मनावर पगडा बसवला होता. निसर्गाचं संजीवक सामर्थ्य सांगलीत किंवा पुण्यात अनुभवता आलं नव्हतं. पण दत्तक होण्यासाठी येताना आंबोलीच्या सृष्टीसौंदर्याने कोकणभूमीनंतिच्या केवळ दर्शनानं भाऊंना आपलंसं करून टाकलं.
ज्या घरी भाऊ ‘घरचा मुलगा’ म्हणून हक्कानं वावरणार होते, ते घर मुख्यत: मातीतेच होते. ज्यांना आपण दत्तक होणार आहोत, ते चुलत चुलते सुखवस्तू जमीनदार आहेत, या कल्पनेने टुमदार घराचं चित्र मनात रंगवलं होतं. ते प्रत्यक्षात कुठं दिसलं नाही. सावंतवाडी येथील हे भटवाडीतील घर आणि सावंतवाडीहून सात-आठ मैलांवर असलेल्या नानेली गावातला जमीन जुमला लहानपणी मातृपितृहीन झालेल्या आणि विष्णुशास्त्रींच्या सावलीत वाढलेल्या सखारामबापूंना मिळाली होती. खरेतर या सगळय़ा मिळकतीवर सखाराम बापूंच्या चुलत भावजयीचा बयाबाईचा अधिकार होता.
मूळ मिळकत माझ्या सास-याची म्हणून दत्तक माझ्याच मांडीवर बसला पाहिजे या बयाबाईच्या हट्टामुळे सखारामबापू आणि बयाबाई यांच्यात संघर्ष सुरू होता. त्यांच्यात कधी दिलजमाई झालीच नसल्याने ती सावंतवाडीस तर ते नानेलीस राहत. दत्तक झाल्यानंतर काही दिवस ते सावंतवाडी-भटवाडीत राहिले. पुढे नानेलीस गेले. दत्तक आईकडून आणि बहिणीकडून अपार माया मिळाली. मात्र, सखारामबापूंकडून सतत उपरेपणाची वागणूक मिळाली. काहीही असलं तरी विष्णू सखाराम खांडेकर हे नाव नानेली गावाशी जोडलं गेलं. त्या गावचा एक घटक म्हणून.
पाच सातशे वस्ती असलेले नानेली लहानसे खेडे. आकेरीच्या बाजारातून माणगाव-नानेलीची वाट फुटते. वेडय़ावाकडय़ा दगडांच्या भल्यामोठय़ा गडग्याच्या विस्तीर्ण पडद्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या वास्तूंपैकी पश्चिमेकडील वास्तू म्हणजे भाऊंचं जुनं घर आणि पूर्वेकडचं घर (मांगर) येथे सखाराम बापूंचं बिऱ्हाड ते परकं घर भाऊंना आपलं वाटावं यासाठी दत्तक आई व बहीण जिवाचा आटापिटा करीत.
ज्यांच्यामुळे दत्तक म्हणून नानेलीत भाऊ आले ती व्यक्ती सखाराम बापू मुलाशी सतत तुसडेपणाने वागत राहिली. त्यांच्या गोठय़ात पंचवीस-तीस गुरे होती. लहान वासरात रमणं त्यांना फार आवडे. कदाचित ‘सुखाचा शोध’ घेण्याचे सामर्थ्य त्यांना इथेच गोठय़ात – मांगरात सापडलं असावं. म्हणूनच ‘अमृत घट भरले तुझ्या घरी! का वणवण फिरशी बाजारी?’ असा प्रश्न त्यांनी स्वत:लाच विचारला असेल.
नानेलीत भाऊंच्या ओळखीचं कुणीच नव्हतं. मन गुदमरून टाकणा-या नानेलीतल्या पहिल्या निवासात खरा धीर मिळाला तो या निसर्गाच्या सहवासानं. नानेलीतल्या भटकंतीत कष्टकरी लोकांच्या अंतरंगाचे दर्शन होई आणि तेथील माणसांच्या दारिद्रय़ाचं मुद्रेवर उमटलेलं प्रतिबिंबही वाचता येई. वैयक्तिक दु:खाच्या जोडीला सामाजिक दु:खही भाऊंनी पदरी बांधून घेतलं. स्वत:चं जीवन थोडं नीटनेटकं होईल.
म्हणून दत्तक झालेल्या भाऊंची बापूंनी दत्तक वडिलांनी पूर्ण निराशा केली होती. त्यांच्या शिक्षणावर ते खर्च करण्यास इच्छुक नव्हते. १९१६-१७ या वर्षी एकाकीपणाची भावना अत्यंत तीव्र झाली. उडाणटप्पूपणाचं कोणतंही बाहय़ लक्षण नसतांना बापूंमुळे केवळ अभ्यासाच्या दृष्टीने वर्ष वाया गेलं. काहींनी असा ग्रह करून घेतला की नाटक, कादंब-या वाचन-लेखनामुळे माझे वर्ष वाया गेले. मी या गोष्टीचे खापर, फारशी चौकशी न करता मला दत्तक देऊन टाकणा-या आणि माझी पूर्वीपेक्षा अधिक कुचंबणा करून ठेवणा-या आप्तेष्टांवर फोडीत राहिलो, असे भाऊ स्वत:च सांगतात.
सावंतवाडीला न राहता भाऊंनी नानेलीला राहावं अशी बापूंची इच्छा दिसल्याने ते मुकाटय़ाने तिथे गेले आणि एकसुरी, कंटाळवाणं जीवन कंठू लागले. अंधश्रद्धेनं पुरेपूर भरलेल्या त्या गावात हिवतापाने आजारी असलेल्या आणि फिट्ससारखा मेंदूविकार सुरू झालेल्या या मुलाची भुताखेतांवरील दृढ विश्वासाने परवड झाली आणि अक्कांच्या पुढाकाराने कुडाळजवळील बांबोळी गावी बिऱ्हाड करून त्या प्रसन्न वातावरणाने, तिथल्या निसर्गाने कथेशी, कवितेशी पुन्हा नातं जोडलं.
बांबोळीतल्या सात-आठ महिन्यांच्या मुक्कामात बसल्या-बसल्या पुष्कळ मोडकं-तोडकं लेखन केलं. लेखनाच्या चाळय़ामुळे मनावरचे मळभ दूर झाले. जरा तब्येत चांगली झाली. भाऊ सावंतवाडीस परतले. भाऊंच्या लेखनामुळे स्थानिक वादळ सुरू झालं. ‘महात्मा बाबा’ या लेखाने भाऊंकडे शिकायला येणारी मुले घराची पायरी चढेनाशी झाली. भटवाडीतील प्रौढ मंडळी ‘महापाप’ केल्यासारखे भाऊंकडे पाहू लागली.
आपल्या जगण्यातलेच सारे संदर्भ घेऊन भाऊंनी अमाप लेखन केलं. मनातील खळबळ शब्दांतून व्यक्त करणे हीच त्यांच्या लेखनाची प्रेरणा. भाऊंना शहर नकोच होतं. त्यांना खेडय़ात जायचं होते.
१३ एप्रिल १९२० रोजी भाऊ शिरोडय़ाला ‘टय़ुटोरिअल इंग्लिश स्कूल’मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. ‘आता मी या शाळेतच राहणार. दुसरीकडे कुठं जाणार नाही, असा निश्चय केला. सोबत होती अक्काची. इथे जोमाने लेखनाला सुरुवात झाली. शाळेसाठीही कितीही कष्ट सोसण्याची भाऊंची तयारी होती.
खेडेगावात कुठल्याही गोष्टीला राजकारणाचं स्वरूप फार लवकर येतं. याचे अनुभव भाऊंना वारंवार आले. तरीही लेखनकाम चालू ठेवत ते मनाला बजावत राहिले. ‘तुझं काम इथंच आहे. या अंधारात, अधून मधून का होईना, मुला चमकत राहिलं पाहिजे, वाट चुकलेले कुणीतरी प्रवासी त्या क्षणिक प्रकाशात सावध होतील. आपल्या योग्य वाटेला लागतील.’ ही जाणीव जागी ठेवली ती भाऊंच्या विद्यार्थ्यांनी. १९२० ते १९२५ या काळात भाऊ अगदी अंतर्बाहय़ एक खेडवळ शिक्षक बनले.
या पाच वर्षात लेखक बनायचं स्वप्न बाजूला पडलं असतं, असे बरेच प्रसंग आले. पण तसं कधी घडलं नाही. त्याचे कारण त्यांच्या लेखनाला असलेली वाचकांची मागणी. १९२४ ते १९३२ या काळात भाऊंनी ‘वैनतेय’मध्ये सातत्याने लेखन केले. हे साप्ताहिकाचे नावही भाऊंनी सुचवलेले. याचं मुख्य क्षेत्र सावंतवाडी संस्थान असल्याने ग्राहक वर्ग मर्यादित. मात्र, महाराष्ट्रातील नव्या-जुन्या साहित्यिकांनी वैनतेयास लेखनसहाय्य केलं इथेच भाऊंना प्रकट व्हायला मोठा अवसर मिळाला.
कथा, कादंब-या, नाटकं, परीक्षणं.. लेखन चालू होतं. १९५९ साली ‘ययाति’ प्रसिद्ध झाली. तिला १९६० चं साहित्य अकादमी पारितोषिक मिळालं. सुखाचा शोध, छाया इ. चित्रपटांना यश मिळालं. मात्र, सतत दुस-यांचा विचार करणा-या भाऊंना आपल्या शाळेचा विसर कधीच पडला नाही. १९३८ मध्ये चित्रपट लेखनाच्या निमित्ताने भाऊ कोल्हापुरास आले आणि अखेपर्यंत कोल्हापुरात राहिले. असं असलं तरी भाऊंचे मन मात्र शिरोडय़ाच्या शाळेत गुंतले होते. कारण कोकणातून कुणीही भाऊंना भेटायला गेलं की त्यांचा पहिला प्रश्न ‘शाळा व्यवस्थित आहे ना? काही अडचण नाही ना?’अखेरच्या क्षणापर्यंत ज्ञानपीठ मिळाल्यानंतरही त्यांचे पाय इथल्या कोकणच्या लाल मातीकडेच ओढ घेत होते. अगदी २ सप्टेंबर १९७६ च्या सकाळपर्यंत इहलोकींची भाऊंची यात्रा संपेपर्यंत!
वि. स. खांडेकरांची साहित्यसंपदा
इ. स. १९२०मध्ये खांडेकरांनी शिरोडा या गावी( सिंधुदुर्ग, महाराष्ट्र ) शिक्षकी पेशास सुरुवात केली. तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. या काळात मिळालेल्या फावल्या वेळेत त्यांनी मराठी साहित्यातील निरनिराळय़ा प्रकारांमध्ये मोलाचे योगदान दिले. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंब-या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिप्पण्या लिहिल्या. ययाति, हृदयाची हाक (१९३०), कांचनमृग (१९३१), उल्का (१९३४), दोन मंने (१९३८), हिरवा चाफा (१९३८), दोन ध्रुव (१९३४), रिकामा देव्हारा (१९३९), पहिले प्रेम (१९४०), क्रौंचवध (१९४२), जळलेला मोहर (१९४७), पांढरे ढग (१९४९), अमृतवेल, सुखाचा शोध, अश्रू, सोनेरी स्वप्ने भंगलेली या त्यांच्या प्रसिद्ध कादंब-या. त्यांना ययाती या कादंबरीसाठी १९६० सालचा साहित्य अकादमी पुरस्कार, तर १९७४ साली ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे ते पहिले मराठी साहित्यिक होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .